महागाव : तालुक्याचा प्रशासकीय कारभार रामभरोसे चालत आहे. प्रशासन झोपेचं सोंग घेऊन पगाराचे धनी बनले आहे. दुसरीकडे जनता वीज, पाण्यासाठी टाहो फोडत आहे.
येथील अपवाद वगळता प्रमुख कार्यालयाचे अधिकारी अप-डाउनमध्ये वेळ घालवत आहे. परिणामी तालुक्यातील जनतेला पूर्णवेळ वीज मिळत नाही. सर्व योजना आणि जनतेला पाणी मिळत नाही. रात्री शहरात काळोख असतो. त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. वीज, पाणी, आरोग्य सेवा कोणत्याही अडथळ्याविना नागरिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुख्याधिकारी व त्यांच्या यंत्रणेची आहे. परंतु मुख्याधिकारी मुख्यालयी न राहता उमरखेडवरून कारभार हाकतात. गेल्या कित्येक महिन्यापासून ते गैरहजर होते.
शहरात समस्या निर्माण झालेल्या असताना आणि संसर्गजन्य आजाराच्या परिस्थितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांची भूमिका उदासीन आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. जनतेला पाणी आणि विजेअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोविड सेंटरसारख्या ठिकाणी दोन-दोन, तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावरून शहरातील अन्य जनतेचे हाल काय असतील, हे सहज लक्षात येते.
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
येथील नगरपंचायतीवर प्रशासक राज आहे. प्रशासक स्वप्नील कापडणीस अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी थोडे जरी लक्ष दिले तरी नगरपंचायतीची यंत्रणा एका सुतात काम करेल, अशी खात्री येथील नागरिकांना आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचा मागोवा घेतल्यास बरीच अनियमितता त्यांच्या निदर्शनास आल्याशिवाय राहणार नाही.