यवतमाळ : सध्याचे सरकार हे केवळ सत्तेसाठी ‘खरेदी-विक्री संघ’ बनले आहे, अशी शाब्दिक हल्ला करीत हजारो शिक्षक, कर्मचारी, कामगार, कष्टकरी आणि सेवानिवृत्त कर्मचारी रविवारी रस्त्यावर उतरले. जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यातून एकवटलेल्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानातून मोर्चा काढला आणि पुन्हा आझाद मैदानातच जाहीर सभा घेत सरकारवर टीकास्र डागले.
तब्बल दोन किलोमीटरपर्यंतचा रस्ता या मोर्चाने व्यापला होता. मोर्चाचे एक टोक पोस्ट कार्यालयाच्या पुढे तर दुसरे टोक संपूर्ण मेनलाइनला विळखा घालून आझाद मैदानात होते. मात्र एवढा लांब मोर्चा असूनही शिस्तबद्ध नियोजनामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही, हे विशेष. ‘सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रातील संघटित, असंघटित कर्मचारी, बेरोजगार, पेन्शनर्स व शेतकरी कृती समिती’च्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील शंभराहून अधिक संघटनांनी हिरिरीने सहभाग नोंदविला होता. राज्य शासनाने सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी नोकरी भरती करण्यासाठी ९ एजन्सी नेमल्या, यावरून मोर्चात असंतोष पाहायला मिळाला. तर सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू करणे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगार यांना वेतनश्रेणी लागू, महागाई नियंत्रणात आणणे अशा मागण्या लक्षवेधी ठरल्या. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आले. मोर्चात तरुण कर्मचारी, निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचारी आणि निवृत्त झालेले कर्मचारी असे सर्व स्तरातील लोक सामील होते. विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. मुख्य मार्गाने फिरल्यानंतर हा मोर्चा पुन्हा आझाद मैदानात विसर्जित झाला.
आम्हाला फक्त शिकवू द्या!जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. शिक्षकांनी ‘आम्हाला फक्त शिकवू द्या!’ असे फलक हाती घेऊन अशैक्षणिक कामांचा कडवा विरोध दर्शविला. तर बेरोजगार तरुणांनी ‘शिक्षक भरती तातडीने करा’ असे फलक झळकविले. आयटकच्या सदस्यांनी मोर्चात झळकविलेले लाल झेंडे लक्ष्यवेधी ठरले. तर नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील अनागोंदीबाबत आवाज उठविला. तर जुनी पेन्शन संघटनेने ध्वनिक्षेपकावर पेन्शनगीत वाजवून मोर्चा दणाणून सोडला.