यवतमाळ : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कृषी, सिंचन, शिक्षण, आदिवासी विकास आणि कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय नवनियुक्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. त्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.
पदभार स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी विविध ठिकाणी केलेेल्या कामांचा अनुभव विशद केला. या अनुभवाच्या आधारावर जिल्ह्यात विकासकामे साध्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यावर प्रथम फोकस राहणार असून, रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यातील कोविड केंद्र वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. लसीकरणाचे प्रमाण वाढविले जाणार आहे. कॉन्टॅक्ट प्रेसिंगही वाढविणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी कृषी क्षेत्रावर भर दिला जाणार आहे. विविध योजनांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. आदिवासी विकासाच्या प्रश्नावर काम केले जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील वातावरण निर्मितीवर त्यांचा भर राहणार आहे.
यापूर्वी आदिवासी आश्रमशाळेत नावीन्यपूर्ण योजना, पुस्तक पेटी योजना, स्पर्धा परीक्षेत मुलांचा कल वाढावा म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा कसोटी, सेमी इंग्लिश शाळा आदी उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. बीडमध्ये १५०० टँकर सुरू असताना पाणीप्रश्नावर केलेला अनुभव गाठीशी असून, त्या बळावर जिल्ह्याचा अभ्यास करून विविध प्रश्नांवर काम करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. टीम वर्क म्हणून सर्व कामे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाॅक्स
हार-तुरे नाकारून थेट कामाला सुरुवात
येडगे यांच्या स्वागतासाठी फूल आणि गुलदस्ते घेऊन अनेक मंडळी दाखल झाली होती. मात्र, त्यांनी हार-तुरे नाकारून थेट कामकाजाला सुरुवात केली. प्रत्यक्ष भेटीवर आणि कामावर त्यांनी भर दिला. शनिवारी अमोल येडगे १२ वाजेच्या सुमारास यवतमाळात पोहोचले. त्यांनी पदभार स्वीकारला आणि लगेच केंद्र शासनाच्या आरोग्य सचिवांच्या व्हीसीकरिता ते हजर झाले. दुपारी ३ पर्यंत व्हीसी चालली. नंतर त्यांनी लगेच आरोग्य विभागाचा आढावा घेतला. विशेष म्हणजे त्यांना पदभार देण्याच्या वेळी मावळते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह उपस्थित नव्हते.