जिल्हा परिषद : सायबर कॅफेत उमेदवारांची गर्दी, तासन्तास बसूनही लिंक मिळेना यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या जम्बो नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या उड्या पडल्या. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार सायबर कॅफेमध्ये गर्दी करून आहे. मात्र दोन दिवसांपासून नोकरभरतीचा सर्व्हर डाऊन झाल्याने एकही अर्ज अपलोड होत नाही. परिणामी उमेदवार चांगलेच वैतागले असून रात्री उशिरापर्यंत सायबर कॅफेत थांबूनही अर्ज मात्र भरता येत नाही. ग्रामीण भागातील उमेदवारांंना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. नियोजित वेळेत अर्ज दाखल करता येणार की नाही, अशी भीतीही उमेदवारांमध्ये दिसत आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या १५ संवर्गातील १९५ जागांसाठी आठवडाभरापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली. या भरतीप्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने निविदा प्रक्रिया राबवून जय कॉम्पुटर्सला हे कंत्राट दिले. यामध्ये आॅनलाईन अर्ज अपलोड करून घेणे, हॉल तिकीट, उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, उत्तर पत्रिका पुरविणे, आॅनलाईन आलेली चलान बँकेत भरणे आदींचा समावेश आहे. यासाठी त्यांनी सर्व्हर तयार केले आहे. मात्र एकाच वेळी अर्ज अपलोड करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हे सर्व्हर डाऊन होत आहे. अनेक उमेदवार सायबर कॅफेत जाऊन जिल्हा परिषदेची साईड ओपन करतात. त्यावरून लिंक घेत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करतात. काही माहिती भरल्यानंतर मध्येच सर्व्हर डाऊन होतो. पुढची प्रक्रिया थांबून जाते. हा प्रकार गत पाच-सहा दिवसांपासून सुरू आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत सायबर कॅफेवर बसूनही एकही अर्ज अपलोड होत नसल्याचे अनेक उमेदवार सांगतात. यामुळे वैतागलेल्या अनेक उमेदवारांनी थेट जिल्हा परिषदेत तक्रारी करणे सुरू केले आहे. विविध विभागातील दूरध्वनीवर सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी येत आहे. या तक्रारींना उत्तर देता देता जिल्हा परिषदेची कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी जय कॉम्पुटर्सला कंत्राट देण्यात आले होते. त्याला सर्व्हर वाढविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्या. मंगळवारी दुपारी २ नंतर हे सर्व्हर सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी अर्ज अपलोड होण्यास सुरुवात झाली होती. मात्र तरीही याची गती अतिशय मंद असल्याने सायबर कॅफेसमोरची गर्दी कायमच होती. याच प्रमाणे बँकेतही चलान भरण्यासाठी ग्रामीण भागातील उमेदवारांची मोठी रांग लागलेली पहावयास मिळाली. १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असल्याने नियोजित दिवसात मोठ्या प्रमाणात अर्जांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा सर्व्हर डाऊन होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी यावर लक्ष ठेऊन आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नोकरभरतीचे सर्व्हर डाऊन
By admin | Published: November 18, 2015 2:36 AM