बहुतेक शासकीय कार्यालयातील प्रकार : कार्यालयीन वरिष्ठांचे दुर्लक्षवर्धा : शासकीय सेवा गतिमान करण्यासाठी सर्व कार्यालयांना इंटरनेटने जोडण्यात आले. सेवा आॅनलाईन झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेटची सुविधा मिळाली आहे. नागरिकांची कामे लवकर व्हावी हा शुद्ध हेतू शासनाचा आहे. पण या सुविधांच्या आड बहुतेक कार्यालयातील कर्मचारी सोशल मीडियावरच व्यस्त आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये फेरफटका मारता असता हे सत्य समोर येते. डिजीटल इंडियाचा नारा भारताने दिला आहे. पूर्वी सर्व शासकीय कामे ही आॅफलाईन असायची. त्यामुळे कामे संथगतीने व्हायची. पण या काही वर्षात ही कामे गतिमान करण्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये ही संगणकीकृत करण्यात आली आहे. कामे आॅनलाईन पद्धतीने होत असल्याने कार्यालयांमध्ये इंटरनेटचे जाळे तयार करण्यात आले. यामुळे कामे गतिमान होऊन ती सोपी झाली. नवी पिढी ही तंत्रज्ञान कौशल्य लगेच आत्मसाद करणारी असल्याने कामाचा वेग वाढला आहे. शासकीय पदभरतीत त्यामुळेच संगणक कौशल्य ही अटही प्रामुख्याने घालण्यात आली आहे. पण याच काही वर्षात सोशल मीडियाची नवनवी माध्यमे उदयास आली आहे. यामध्ये फेसबूक, व्हॉट्स अॅप आदी माध्यमांचा बोलबाला आहे. युुवा पिढीसह वयोवृद्ध मंडळीही या माध्यमांपासून दूर राहिलेली नाही. ही माध्यमे वापरण्यावर कुणाचेही बंधन नाही. परंतु कार्यालयात कामासाठी मिळालेल्या संगणकाचा व इंटरनेट सुविधेचा फेसबूक सर्फिंगसाठी वापर या काही दिवसांमध्ये वाढला आहे. अनेक कार्यालयामध्ये कागदोपत्री व्यवहार हे ई-मेलच्या माध्यमातून होतात. त्यामुळे ती सुविधा वापरणे अनिवार्य आहेत. पण या सोबत वेळात वेळ काढून किंवा कामाच्या वेळातही कामे बाजूला ठेवून संगणकावर फेसबूक सर्फिंग करणारी अनेक मंडळी शासकीय कार्यालयांमध्ये फेरफटका मारला असता दिसून येते. यामध्ये तरूण युवक युवतींचा जास्त सहभाग आहे. याचा विपरित परिणाम कामावर होत आहे. अनेक जण कार्यालयात आल्याबरोबर तास दोन तास फेसबूकवर रममाण झालेले असतात. किंवा इतर काम करतानाही सोबत सोबत कुणी चोरून लपून तर कोणी बिनधास्तपणे सोशल नेटवर्किंग करीत असतात. त्यामुळे कार्यालयांमध्ये अश्या सोशल नेटवर्किंग साईट बॅन असणे गरजेचे आहे. वारिष्ठांनी लक्ष देत कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी)
कर्मचारी सोशल मीडियावर व्यस्त
By admin | Published: December 28, 2015 2:35 AM