ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत असताना आता या लढ्यात कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. आपले एक दिवसाचे वेतन देण्याची संमती विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तसेच नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी शहरातील सामाजिक संघटना व प्रतिष्ठीत व्यापारी-उद्योजक यांनाही मदतीचे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून टंचाई निवारणासाठी निधी उभारला जात आहे.पाणीटंचाईचे नैसर्गिक संकट निवारणासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक व शासकीय कर्मचाºयांनी आपले उत्तरदायित्व स्वीकारण्याची हमी घेतली आहे. टंचाईची तीव्रता उपाययोजनांच्या माध्यमातून कमी करण्याकरिता नगराध्यक्ष कांचनताई बाळासाहेब चौधरी यांनी विविध सामाजिक संघटना, गावातील प्रतिष्ठीत व्यापारी, उद्योजक यांची बैठक मंगळवारी नगरपरिषदेत बोलाविली होती. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुभाष राय उपस्थित होते. बैठकीत शहरातील टंचाई निवारणार्थ कुठल्या उपाययोजना करता येईल यावर सकारात्मक चर्चा झाली. अनेक ज्येष्ठांनी हमखास पाण्याचे स्रोत शहर परिसरात कुठे उपलब्ध आहे, याचीही माहिती दिली. बैठकीला शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी उपस्थित होते. टंचाई निवारणासाठी नगरपरिषदेपुढे आर्थिक मर्यादा आहेत. या संकटाच्या काळात दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी नगरपरिषद कर्मचाºयांनी आपला एक दिवसाचा पगार टंचाई उपाययोजनेत देण्याची ग्वाही दिली. हीच संकल्पना घेऊन संतोष ढवळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राध्यापक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (आरटीओ), माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयांतर्गत कर्मचारी व शिक्षक, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा यांच्याशी चर्चा केली. या सर्वांनी एक दिवसाचे वेतन टंचाई उपाययोजनेत देण्याचे आश्वासन दिले.याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्याकडेसुद्धा हा प्रस्ताव ठेवणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.टंचाई उपाययोजनेसाठी एक रुपयापासून एक दिवसाच्या पगारापर्यंत मिळणारी सर्वच मदत लोकोपयोगी ठरणारी आहे. एकट्या प्रशासनावर भार टाकून हे संकट सुटणारे नाही, या भावनेतून मदतीसाठी प्रत्येक जण पुढे येत असल्याचे नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी सांगितले. तसेच नगरपरिषदेने शहरातील जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी साडेतीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.तानाजी सावंत यांच्याकडून पाच लाखांची लोकवर्गणीयवतमाळ विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी शहरातील टंचाई निवारणासाठी चार महिने दोन टँकर चालविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची लोकवर्गणी देण्याची तयारी दूरध्वनीवरून दर्शविली. लवकरच हे टँकर जनतेच्या सेवेत रुजू होतील, असे शिवसेना संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी सांगितले.४५ स्वयंसेवी संस्थांची समितीयवतमाळ शहरातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी नगराध्यक्षांनी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत तब्बल ४५ स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. या संस्थांच्या मदतीने शहरात टँकरद्वारे पाणी वितरण, पाणी वाटपाचे एटीएम आणि जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. या स्वयंसेवी संस्थांची एक समिती तयार करण्यात येणार आहे.
पाणीटंचाई लढ्यात कर्मचाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:18 PM
शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सर्वातोपरी प्रयत्न करीत असताना आता या लढ्यात कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे.
ठळक मुद्देएक दिवसाचे वेतन : सामाजिक संघटनांचे सहकार्य