नागरिकांचा आरोप : दोषींवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आर्णी : शहरात नुकतेच अतिक्रमण काढण्यात आले. परंतु ते बेकायदेशीर व अन्यायपूर्ण असल्याचा आरोप करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून अतिक्रमणधारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी शुक्रवारी संतप्त अतिक्रमणधारकांनी माहूर चौकात ठिय्या दिला. अतिक्रमण काढण्यापूर्वी सात दिवस आधी नोटीस बजावणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. एक दिवसापूर्वी नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा दावा अतिक्रमणधारकांनी केला आहे. जिनिंगच्या समोरिल अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण काढले. यानंतर मागील शेतजमिनीची ले-आऊट म्हणून नगरपरिषदेत नोंद नसताना देखील हा सर्व्हीस रोड असल्याचे दाखवून येथील अतिक्रमण काढण्यात आले. इतर ठिकाणी सर्व्हीस रोड मात्र नोंद असूनही मोकळा केल्या गेला नाही. यामध्येच काही लोकांच्या पक्क्या बांधकामांना हातही लावण्यात आला नाही, असा आरोप अतिक्रमणधारकांनी केला आहे. यावेळी तहसीलदार सुधीर पवार यांना निवेदन देऊन त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सुरूवातीला नगर परिषदेसमोर गोळा होऊन नंतर मात्र व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे कूच केली. मोठ्या संख्येने व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूकही खोळंबली होती. तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी साजीद बेग, छोटू देशमुख, अन्वर पठाण, कादर इसानी, अतुल मुनगिनवार, खालीद शेख, विनोद देवकर, सद्दाम बैलिम, प्रकाश कराळे, जाकीर सोलंकी, राजेश यादव, वसीम खान, आबीद फानन, नवीन भगत, आमीनभाई, खालीदभाई घोडेवाले आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम विभागाने २२६ अतिक्रमणधारकांना रितसर नोटीस देऊन रजिस्टर सह्या घेतलेल्या आहेत. ७ सप्टेंबर २०१० च्या जीआरनुसार अतिक्रमण काढताना कायदेशीर कारवाईचा इशारा जरी दिला तरी अतिक्रमण काढता येते. त्यामुळे झालेली कारवाई योग्यच आहे. - सुधीर पवार, तहसीलदार, आर्णी दुग्ध व्यावसायिकांना फटका शहरात अतिक्रमण हटाओ मोहीर राबविण्यात आल्यामुळे गुरूवार, शुक्रवारी दिवसभर अनेक चहा कॅन्टींग बंद होत्या. त्यामुळे या दुकानांना दूध पुरविणाऱ्या अनेक दूध विक्रेत्यांना याचा फटका बसला. आज हेच दूध विक्रेत शहरात फिरून ‘दूध विकत घ्या, बासुंदी बनवा बाई’ अशी विनवनी करीत चौकाचौकात फिरत होते. दोन पैसे कमी द्या, परंतु दूध घ्या अशा प्रकारची विनवनी दूध विक्रेत्यांकडून महिलांना होतांना दिसत होती. इतरवेळी गरजा असतानाही दूध विकत न देणारे विक्रेते आज मात्र बेभाव दूध विकत असल्यामुळे अनेकांनी ते विकत घेतले.
अतिक्रमण हटाओ मोहीम अन्यायकारक
By admin | Published: July 30, 2016 12:57 AM