लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदाणीतील कोळसा चोरी प्रकरणात वसुलीची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे पेशी झाली.यातील एक कर्मचारी वणी ठाण्याचा तर दुसरे दोघे शिरपूर ठाण्यातील आहेत. एसपींनी त्यांची चोरीतील कोळसा वाहतुकीतून होणाऱ्या वसुली प्रकरणात झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. पेशी झालेल्या शिरपूरच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक जण चोरीतील आरोपी पळून गेल्याच्या कारणावरुन काही महिन्यांपूर्वी निलंबित झाला होता. मात्र त्याने जोरदार मोर्चेबांधणी करून पुन्हा शिरपूर पोलीस ठाणे मिळविण्यात यश प्राप्त केले. वणी व शिरपूरसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेहमीच प्रचंड धडपड, रस्सीखेच पहायला मिळते. अनेकदा रॉयल्टीचा मार्गही वापरला जातो. या मागे या दोन ठाण्यांमागे होणारी सर्वाधिक आर्थिक उलाढाल हे प्रमुख कारण सांगितले जाते. जिल्ह्यात वणी हे वरकमाईत पहिल्या क्रमांकाचे तर शिरपूर दुसऱ्या क्रमांकाचे ठाणे मानले जाते. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यात नियुक्ती होताच पोलीस अधिकाऱ्यांना वणी, शिरपूरची स्वप्ने पडू लागतात.पैनगंगा खाणीतून दरदिवशी चोरट्या मार्गाने दहा ते पंधरा ट्रक कोळसा शिरपूर मार्गे वणीत लालपुलिया भागात आणला जातो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते. बाजारभावाने आठ लाख रुपये किंमत असलेला हा कोळशाचा ट्रक दोन नंबरमध्ये साडेतीन ते चार लाखांत विकला जातो. या माध्यमातून दरदिवशी केवळ कोळशाची उलाढाल ५० ते ७५ लाखांच्या घरात जाते. त्याचे लाभार्थीही अनेक आहेत. म्हणूनच या व्यवहारातील वसुलीची जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना एसपींनी पाचारण केले होते. आता त्यांच्यावर व त्यांच्या वरिष्ठांवर काही कारवाई होते का याकडे लक्ष लागले आहे. कारवाई न झाल्यास ही पेशी वांझोटी ठरणार आहे.
वणी, शिरपूर पोलिसांची अखेर एसपींपुढे पेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 9:46 PM
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदाणीतील कोळसा चोरी प्रकरणात वसुलीची महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे पेशी झाली.
ठळक मुद्देकारवाईवर नजरा : पैनगंगा खाणीतील कोळसा चोरी