कार्यशाळा : चार दिवस विविध प्रश्नांवर चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील विकल्प अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. २३ जूनला दुपारी २ व ५ वाजता, तर २४, २५ व २६ जून रोजी सकाळी ११ वाजता आणि दुपारी ५ वाजता ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. यात सर्व प्रश्नांवर सांगोपांग चर्चा आणि मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सामायिक केंद्रीभूत आॅनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. ‘जेडीआयईटी’ हे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर ईएन-११२०) आहे. आॅनलाईन विकल्प अर्ज भरण्याची सुविधा या केंद्रात नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. बारावी आणि प्रवेश परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम असतो. प्रवेश प्रक्रियेतील विकल्प अर्ज भरणे (आॅप्शन फॉर्म फिलिंग) हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये अनभिज्ञता आढळते. हा अर्ज भरताना अनेकदा चुका होवून विद्यार्थ्यांचे नुकसान होते. ‘जेडीआयईटी’मध्ये सत्र २०१७-१८ च्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमधील विकल्प अर्ज अचूक व परिपूर्ण कसा भरावा यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश मार्गदर्शन केंद्र रविवारीही सुरू ठेवले जाईल, असे सुविधा केंद्र प्रमुख डॉ. राजेश वानखडे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. विवेक गंधेवार (९७६३७०२५६९) व प्रा. संदीप सोनी (९७६३७०२५८३) यांनी कळविले आहे. या मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी केले आहे.
‘जेडीआयईटी’त अभियांत्रिकी प्रवेश विकल्प अर्ज मार्गदर्शन
By admin | Published: June 22, 2017 1:00 AM