महागावातील ९१ लाखांच्या रस्त्याचे प्रकरण : बचावाचा प्रयत्न, नव्याने होणार काम लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : महागाव तालुक्यातील ९१ लाखांच्या रस्ता बांधकामात कंत्राटदार परस्परच कामे करतो, आम्ही सांगूनही ऐकत नाही, असा युक्तीवाद अभियंते करीत आहेत. त्यावरून पुसद विभागातील कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. महागाव तालुक्यातील वेणी-सवना-वाकोडी-मोरदा या चार किलोमीटरच्या ९१ लाखांचे बजेट असलेल्या रस्त्याचे काम अकबरी नीलेश कन्नूभाई पटेल या कंत्राटदारामार्फत केले जात आहे. डांबरी रस्ता उखडून तेथे नव्याने काम करायचे होते. मात्र कंत्राटदाराने डांबरी रस्त्याचेच मटेरियल तेथे वापरुन थातूरमातूर काम करण्याचा प्रयत्न केला. या कामावर कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता आणि एखादवेळी कार्यकारी अभियंत्याने नजर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र सुरु असलेल्या कामाचा दर्जा पाहता एक तर अभियंत्यांनी या कामावर नजर ठेवली नसावी किंवा त्यांचे कंत्राटदाराशी संगनमत असावे, अशी शंका येत आहे. ‘लोकमत’ने या संबंधी वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम अभियंत्यांनी सारवासारव सुरू केली आहे. या खात्यातील स्थानिक जबाबदार अभियंते म्हणतात, कंत्राटदाराला वेळोवेळी सांगितले गेले मात्र त्याने त्याच्या मनानेच कामे केली आहेत. त्याने आमच्या माघारी कामे केली. यावरून कंत्राटदार अभियंत्यांचे ऐकत नसल्याचे स्पष्ट होते. कंत्राटदाराला देयक दिले नसल्याने त्याच्याकडून पुन्हा काम करून घेतले जात आहे. चुक करूनही कंत्राटदाराला शिक्षा न करण्याची अभियंत्यांची भूमिका पाहता त्यांचे संगनमत उघड होते. चार किलोमीटरच्या या रस्त्याच्या खडी व मुरुम गोळा करणे व दबाईसाठी किमान दोन महिने अवधी लागतो. नियमानुसार एका दिवशी दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त काम करता येत नाही. माजी आमदार पुत्राचे स्मरणपत्र ९१ लाखांच्या या रस्ता बांधकामातील गैरप्रकारात वाकोडी येथील माजी आमदार भीमराव देशमुख यांचे पुत्र शिवाजीराव देशमुख यांनी ८ मे रोजी तक्रार केली होती. परंतु संगनमतामुळे या तक्रारीला बांधकाम अभियंत्यांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. या प्रकरणात काय कारवाई केली, अशी विचारणा करणारे स्मरणपत्र माजी आमदार पुत्राने मुख्य अभियंत्यांपर्यंत सोमवारी पाठविले आहे. तहसीलदारांचा अहवाल उमरखेड एसडीओंकडेउपरोक्त रस्त्याच्या कामात क्रेशर मेटल ऐवजी हातफोडी गिट्टी वापरली गेली आहे. त्यासाठी १६०० क्यूबीक मीटर गौण खनिज चोरी करण्यात आली. त्याची किंमत दोन लाख ८९ हजार आहे. या प्रकरणात ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महागाव तहसीलदारांनी आपला अहवाल उमरखेड उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे पाठविल्याची माहिती आहे. मात्र अहवालात नेमके काय दडले आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्याबाबत गुप्तता पाळण्याची ‘दक्षता’ तहसील कार्यालयाकडून घेतली जात आहे. ५८ लाखांचा होऊ शकतो दंडया गौण खनिज चोरी प्रकरणात २० पट दंडाची तरतूद असल्याने कंत्राटदाराला सुमारे ५८ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. तो वाचविण्यासाठीच कंत्राटदार चार किलोमीटरच्या या रस्त्याचे नव्याने काम करण्यास तयार झाला आहे. या कंत्राटदाराला पुसद, महागावच्या बांधकाम अभियंत्यांचीही ‘मोलाची’ साथ लाभते आहे.
अभियंत्यांना कंत्राटदार जुमानत नाहीत !
By admin | Published: May 23, 2017 1:24 AM