मारेगाव : इंग्रजी शिक्षणाचे आकर्षण आता खेड्यापाड्यातही पोहोचल्याने ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे़ आरटीई कायद्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल ३४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे़सध्या राज्यात राष्ट्रीय शिक्षा अभियान कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे़ या कायद्यानुसार ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असेल, अशा शाळा बंद होण्याची भिती आहे़ बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थी लगतच्या मोठ्या शाळेत जोडण्यात येणार आहे़ गेल्या २६ जूनला तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली़ पहिल्या दिवसापासून इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गणवेश घालून गर्दी केली़ त्याच्या विपरीत चित्र जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे़ शाळा सुरू होऊन २० दिवस लोटले़, तरी मराठी शाळांमधील चित्र फारसे पलटलेले दिसत नाही़ सध्या सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची ‘के्रझ‘ दिसून येत आहे. शहराप्रमाणे खेडोपाडी इंग्रजी शाळांचे जाळे विणला जात आहे. इंग्रजीशिवाय आपल्या मुलांचे भविष्य अंधकारमय होईल, त्यांचा करिअरचा मार्ग केवळ इंग्रजी शाळेतूनच जातो, असा गैरसमज सध्या ग्रामीण भागात रूढ केला जात आहे़ त्यामुळे इंग्रजीचे लोण गावागावात पोहोचले आहे़ इंग्रजी शाळांचे शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थी मिळवितात. आधुनिक युगात इंग्रजी शिक्षणाचे महत्व ते अतिरंजीतपणे पालकांना पटवून देतात. नंतर पालकांचीही मानसिकता इंग्रजीतून शिक्षण घेतल्यानेच आपल्या मुलाचे भवितव्य घडू शकते, अशी बनल्याने आता जिल्हा परिषद शाळा ओस पडून इंग्रजी शाळा फुलू लागल्या आहेत़ भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी, एवढेच नव्हे तर सालदार म्हणून काम करणाऱ्या पालकांची मुलेही सध्या इंग्रजी शाळातून शिक्षण घेताना दिसून येत असल्याने मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
इंग्रजीमुळे मराठी शाळांची अस्मिता आली धोक्यात
By admin | Published: July 20, 2014 12:10 AM