गांधी चौक : मंदिरासमोर भजनाच्या माध्यमातून जनजागृती लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील गांधी चौकात नव्याने सुरू होत असलेल्या दारू दुकानाला विरोध म्हणून शुक्रवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. परिसरातील महिला व पुरुषांनी देवी-देवतांना साकडे घालून राष्ट्रप्रेम जागविणाऱ्या भजनातून जनजागृती केली. गांधी चौकातील शहाडे कॉम्प्लेक्स येथे नव्याने दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात गांधी चौक, माळीपुरा परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देवून दारू दुकानाला परवानगी देवू नये, अशी मागणी केली. परंतु याबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास माँ दंडूमारम्मा देवीसमोर परिसरातील लोकांनी एकत्र येवून दारू दुकानाला विरोध केला. गणेश महिला भजनी मंडळाने भजने सादर केली. देवी-देवतांना साकडे घालत भजने म्हटली. दरम्यान, या अभिनव आंदोलनाला नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुभाष राय यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आपणही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
दारू दुकानाच्या विरोधासाठी साकडे
By admin | Published: June 24, 2017 12:41 AM