पुसद विभाग : खासगी संस्थांमध्ये भरमसाठ शुल्क, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : सध्या सर्वत्र पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची धडपड सुरू असून पुसद तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील खासगी संस्थांमध्ये प्रवेश शुल्काआड पालकांची लूट केली जात आहे. भरमसाठ प्रवेश शुल्क आकारले जात असून यावर शिक्षण विभागाचेही नियंत्रण दिसत नाही. कुणी आवाज उठविला तर त्याच्या पाल्याला प्रवेश नाकारला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्यांना नामवंत संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक पालकाची धडपड सुरू आहे. पुसद शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ग्रामीण संस्था आहे. या संस्थांनी आता प्रवेश शुल्क आकारणे सुरू केले आहे. पूर्वी विद्यार्थी मिळत नसल्याने पालकाच्या घरी जावून विद्यार्थ्यांना आणले जात होते. आता त्याच संस्था ‘गुणवत्ताधारक’ झाल्याने प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लावली जाते. प्रवेश शुल्क दिले की कुणालाही तेथे सहज प्रवेश मिळतो. पालक अशा विविध शाळांमध्ये जावून अर्ज विकत घेवून भरत आहे. परंतु प्रवेश देण्याच्या वेळी देणगीच्या नावाखाली शुल्क आकारले जाते. शहरातच नव्हेतर ग्रामीण भागातील शाळाही यात मागे नाही. आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षणहक्क कायद्यात २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली. ग्रामीण भागातील संस्थाचालक अशा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. परिणामी गरीब विद्यार्थी वंचित राहात आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरल्याने अनेक पालक खासगी शिक्षण संस्थाकडे वळले आहे. हीच बाब हेरून अनेक खासगी शाळांनी पालकाची लूट चालवली आहे. शिक्षण विभागही अशा संस्थांवर मेहेरनजर दाखविताना दिसून येते. प्रवेशबंदीचे फलक नावापुरतेच पुसद शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये प्रवेशबंद झाल्याचे फलक दर्शनी भागात झळकत आहे. परंतु अधिक चौकशी केली तर काही शुल्क भरून विद्यार्थ्यांना सहज प्रवेश दिला जातो. याला काही संस्था अपवादही असतील. परंतु शिक्षण सम्राट अशा क्लृपत्या आखून गरजवंत पालकांची पिळवणूक करीत आहे. विशेष म्हणजे या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुमारस असतो. परंतु खासगी शिकवणीच्या भरोशावर विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करतात.
प्रवेश शुल्काआड पालकांची लूट
By admin | Published: July 06, 2017 12:52 AM