प्रस्ताव मंजूर : पोलीस गृहनिर्माण मंडळाचा पुढाकार, पोलीस अधीक्षकांचा पाठपुरावा सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कायदा व सुव्यवस्थेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांसाठी येथील पळसवाडी कॅम्पमध्ये तब्बल ८२० नवीन घरकुलांची सुसज्ज वसाहत उभारली जाणार आहे. या प्रस्तावाला पोलीस गृहनिर्माण मंडळाने मंजुरी दिल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाला सुरूवात होणार आहे. शहर, वडगाव रोड आणि लोहारा पोलीस ठाणे, एसआयडी, सीआयडी, एससीबी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी यवतमाळात स्वतंत्र नवीन वसाहत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला. आराखड्यात पोलिसांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल, पोलीस क्लब, आदी सुविधांचा समावेश करण्यात आला. याशिवाय या वसाहतीत मल्टीपर्पज हॉलसुद्धा साकारण्यात येणार आहे. बिग बाजारच्या धर्तीवर पोलीस कॅन्टीनही प्रस्तावित आहे. या नव्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पोलीस गृह निर्माण मंडळाच्या महासंचालकांकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला गृह मंडळाकडून तत्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यातील काही त्रृट्यांची पूर्तता पोलीस अधीक्षक स्तरावरून करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या पुढील कामकाजाची प्रक्रिया पोलीस गृह मंडळस्तरावरच पूर्ण केली जाणार आहे. नव्या वसाहतीत पहिल्या टप्प्यात ५४० क्वॉर्टर साकारण्यात येईल. त्यासाठी पळसवाडी कॅम्प अथवा पोलीस मुख्यालयातील जीर्ण क्वॉर्टर तोडून जागा तयार केली जाणार आहे. नेमकी यापैकी कोणती जागा गृह निर्माण मंडळाकडून निश्चित केली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. दोन वर्षात ही वसाहत तयार होऊन तिचे पोलिसांना हस्तांतरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २८० क्वॉर्टर बांधले जाणार आहे. यामुळे येत्या दोन वर्षात जवळपास ८२० पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचे टुमदार निवासस्थान मिळणार आहे. अनेक वर्षांपासून असलेली पोलीस कर्मचाऱ्यांनी समस्या यामुळे निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी पोलीस महासंचालक गृह निर्माण मंडळस्तरावर प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने यवतमाळ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र अनेक दिवसांपासून ते बंद होते. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तातडीने सर्व कॅमेरे सुरळीत सुरू करण्याचे निर्देश दिले. आता सर्वच ८६ कॅमेरे सुरू असून पोलीस मुख्यालयात त्यांचे कंट्रोल रूम आहे. २४ तास सर्व कॅमेऱ्यांनी टिपलेल्या हालचालींवर निगराणी ठेवली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी आहे. पुसद अपर एसपींसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र प्रचंड मोठे आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या अनेक अडचणी येतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुसद विभागाला अपर पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी देण्याची मागणी आहे. मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. तसेच उमरखेड येथे स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देण्याचाही प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. त्यासाठीसुद्धा पाठपुरावा सुरू असल्याचे एम. राज कुमार यांनी सांगितले.
८२० घरकुलांची सुसज्ज पोलीस वसाहत
By admin | Published: May 20, 2017 2:31 AM