पुसद हे पुतळ्यांचे शहर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शहरात छत्रपती शिवराय, महात्मा फुले, महात्मा गांधी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, गौतम बुद्ध, अण्णाभाऊ साठे, गोधाजीराव मुखरे, फुलसिंग नाईक, देवराव पाटील चोंढीकर, डाॅ.पंजाबराव देशमुख आदींचे पुतळे आहे.
१५ वर्षांपूर्वी पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष सतीश बयास यांच्या कार्यकाळात सहकार सूर्य श्रीराम उर्फ अप्पाजी आसेगावकर व माजी नगराध्यक्ष आणि विदर्भवादी नेते विश्वनाथसिंह बयास यांचे पुतळे उभारण्याचे ठरविले होते. पंचधातूचे पुतळेही तयार करून घेतले होते, परंतु शासनाने पुतळे बसविण्याच्या नियमावलीत बदल केल्याने हे दोन्ही पुतळे बसविणे शक्य झाले नव्हते. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विश्वनाथसिंह बयास यांचा पुतळा दीड ते दोन वर्षांपूर्वी येथील हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात बसविण्यात आला. मात्र, कोरोनामुळे अनावरण झाले नाही.
श्रीराम अप्पाजी आसेगांवकर हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे निकटचे सहकारी होते. त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणण्यासाठी श्रीरामपूर परिसरात सहकारी तत्त्वावरील पहिली सूत व कापड गिरणी स्थापना केली. त्यांनी विविध पदे भूषविली. गरजूंना घरे उपलब्ध करून दिली.
बॉक्स
जागेचा प्रश्न निकाली निघाला
अप्पाजींचा पुतळा कुठे बसवावा, हा प्रश्न पुढे आला. त्यावेळी दीपक आसेगावकर यांनी शासकीय सोपस्कार पूर्ण करून, पुतळा उभारणीसाठी श्रीरामपूर येथील जागेची परवानगी मागितली, नंतर पंचधातूंचा साडेदहा फूट उंच पुतळा व लगतच्या सुशोभीकरणाचे कार्य आर्किटेक्चर सुमित जांगीड व कंत्राटदार सुनील जांगीड यांच्या मार्गदर्शनात वेगात सुरू आहे. कोरोनाचे सावट कमी होताच, पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल, असे दीपक आसेगावकर यांनी सांगितले.