पावसाचा धोका : ६५ हजार क्ंिवटल तूर उघड्यावर पडून यवतमाळ : केंद्र शासनाने तूर खरेदीचे शासकीय केंद्र पुढे सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करेल, अशी घोषणा मंगळवारी मुंबईत केली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु कालपासून प्रतीक्षा असलेला तूर खरेदीचा आदेश बुधवारी सायंकाळपर्यंतही पोहोचलेला नव्हता. त्यामुळे तूर खरेदीचा गुंता कायम आहे. मुख्यमंत्र्यांची तूर खरेदीची घोषणा फसवी ठरते की काय, अशी हूरहूर शेतकऱ्यांना लागलेली आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी तुरीचा अखेरचा दाणा शिल्लक असेपर्यंत तूर खरेदी करू, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात २२ एप्रिलनंतर शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सकाळी घोषणा केल्याने दुपारपर्यंत आदेश निघून बुधवारपासून तूर खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात अद्याप आदेशच जारी झालेला नाही. त्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागते, याकडे लक्ष लागले आहे. तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात नऊ हजार शेतकरी बाजार समितींच्या आवारात मुक्कामी आहेत. घरापासून त्यांचा संपर्क तुटला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात मोजणीच्या प्रतीक्षेत ६५ हजार क्ंिवटल तूर पडून आहे. त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांचा माल यार्डात आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर आहे. महिनाभरापूर्वी खरेदी होऊनही व्यापाऱ्यांनी आपला माल गोदामात हलविलेला नाही. त्यामुळे बाजार समितीतील यार्ड व्यापाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचा ठोका वाढला आहे. पाऊस आल्यास उघड्यावर असलेली ही तूर भिजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने हालचाली करून तूर खरेदीचा गुंता सोडवावा, अशी तमाम शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे. (शहर वार्ताहर)
‘सीएम’च्या घोषणेनंतरही तूर खरेदी आदेश पोहोचलाच नाही
By admin | Published: April 27, 2017 12:24 AM