नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावचा पोरगा मुंबईत अधिकारी झाला, तेव्हा गावाला भरभरून आनंद झाला होता. पण आता त्याचा मृत्यू झाला अन् तो गावकऱ्यांना ‘परका’ वाटू लागला. कारण त्याचा मृत्यू झाला कोरोनाग्रस्त काळात अन् कारोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत. गावापासून दूर राहणाऱ्या या पोराच्या मनात गाव मात्र खोलवर रुजला होता. म्हणून आपला अंत्यविधी मूळ गावातच करा ही अंतिम इच्छा त्याने कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याचा मृतदेह मंगळवारी ‘लॉकडाऊन’ भेदत हजार किलोमीटर ओलांडत गावापर्यंत आला... पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून गावकरी म्हणाले याचा अंत्यसंस्कार आमच्या गावात होऊ देणार नाही! मग मृतदेह जवळच्याच काकाच्या गावात नेण्यात आला. तेथेही अंत्यसंस्काराला नकार मिळाला.. शेवटी कसाबसा यवतमाळात अंत्यविधी उरकून कुटुंबीय रडले... गेलेल्या माणसासाठी अन् संपलेल्या माणुसकीसाठी!कोरोनाच्या विषाणूपेक्षाही जास्त वेगाने भीतीचा विषाणू पसरत आहे. त्याचे हे कडवे सत्य उदाहरण घडले पांढरकवडा तालुक्यातील वागदा गावात. या गावातील तुळशीराम उकंडा राठोड हा तरुण काही वर्षांपूर्वी मुंबईला नोकरीसाठी गेला. नगररचनाकार (टाऊन प्लॅनर) या अधिकारी पदावर त्यांची कारकीर्द बहरली होती. पण अचानक सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पार्थिवावर मूळगावातच अंत्यसंस्कार व्हावे, ही त्यांची अंतिम इच्छा होती. म्हणून कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह मुंबईतून वागद्यात आणण्याची तयारी केली. परंतु कोरोनाच्या या काळात त्यांचा मृतदेह घेऊन गावापर्यंत येणे हेही महाकठीण काम होते. शेवटी आवश्यक त्या परवानग्या काढून रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पांढरकवडा तालुक्यातील वागदा येथे नेण्याचे ठरले.
गावकऱ्यांची सावधगिरीची भूमिकासर्वत्र सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन असल्यामुळे गावागावात काळजी घेतली जात आहे. मृतदेह घेऊन येत असलेल्या राठोड कुटुंबीयांनी ‘आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वागदा येथे घेऊन येत असल्याची’ माहिती वागदा येथील नातेवाईकांना दिली. त्यानंतर गावात चर्चा झाली. चर्चेअंती गावातील लोकांनी ‘आम्ही येथे अंत्यसंस्कार करू देणार नाही’, अशी भूमिका घेतली. गावात वाद नको म्हणून राठोड कुटुंबीयांनी घाटंजी तालुक्यातील जरंग या आपल्या काकाच्या गावात अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. जरंग येथील नातेवाईकांना याबाबत विचारणा करण्यात आली. परंतु तेथील गावकऱ्यांनीही आपल्या गावात अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर तुळशीराम राठोड यांचा मृतदेह मुंबईवरून सकाळी यवतमाळला आणण्यात आला. दर्डानगरात फ्लॅट असलेल्या इमारतीजवळ काही काळ ही रूग्णवाहिका उभी राहिली. त्यानंतर यवतमाळ येथेच त्यांच्या मृतदेहावर मंगळवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहराचे ‘प्लॅनिंग’, पण गावात मिळाली नाही ‘जागा’तुळशीराम राठोड मुंबई महापालिकेत टाऊन प्लॅनर (नगररचनाकार) होते. मुंबईसारख्या महानगरातील नगरांचे ‘प्लॅनिंग’ त्यांच्याकडे होते. मात्र या कामाच्या निमित्ताने ते आपल्या वागदा या मूळगावापासून दूर झाले. महानगराचे प्लॅनिंग करताना ते वागदा गावातील नाते घट्ट करू शकले नाहीत. त्यामुळे ‘शहरी’ मृतदेह गावकऱ्यांनी नाकारला. तुळशीराम राठोड यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. पण मुंबईतील कोरोनाचे भयावह वातावरण पाहून गावकऱ्यांनी या मृतदेहाला आपल्या गावात जागा दिली नाही.
तुळशीराम राठोड यांच्या पार्थिवावर वागदा येथे अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांच्याच काकाचे गाव असलेल्या जरंग येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. परंतु तेथील गावकऱ्यांनीही नकार दिला. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीमुळे सावधगिरी म्हणून गावकऱ्यांनी अशी भूमिका घेतली.- बाळकृष्ण राठोड,पोलीस पाटील, वागदा