फोटो
महागाव : महागाव ते फुलसावंगी रस्त्यावरील वीज वितरण कंपनीचे विजेचे खांब काढून टाकण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च म्हणून २६ लाख रुपयांचा भरणा संबंधित विभागाकडे केला. मात्र, दोन वर्षांचा कालावधी लोटूनही वीज वितरण कंपनीने रस्त्यामधील अडथळा अद्याप दूर केला नाही.
केंद्रीय रस्ते विकास निधीमधून (सीआरएफ) महागाव ते फुलसावंगी या १४ किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु, या रस्त्याच्या मधोमध वीज वितरण कंपनीचे खांब आहे. ते काढण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्चापोटी २६ लाख रुपये दोन वर्षांपूर्वी वीज वितरणकडे भरले. वितरण कंपनी मात्र खांब रस्त्यांमधून काढून टाकत नसल्यामुळे विकासात्मक कामाला अडथळा निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब आणि डीपीमुळे महागाव शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार सूचना देऊन कोणताही उपयोग झालेला नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी अपघात वाढलेले आहेत. वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन रस्त्याच्या मधोमध असलेले खांब त्वरित इतरत्र हलवावे, अशी मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे.