लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘शेण खाऊ नको’ असे सांगितले की हट्टी माणसे मुजोरीने शेणाकडेच धावतात. त्याचाच प्रत्यय कोरोना काळातील खर्रा, गुटखा बंदीच्या बाबतीत येत आहे. संसर्ग टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश नाममात्र पाळला जात आहे. मात्र छुप्या मार्गाने आणि दामदुप्पट दराने हे घातक पदार्थ विक्री होत असल्याचे सदर प्रतिनिधीने सोमवारी काही चौकांमध्ये फेरफटका मारला असता दिसून आले.लॉकडाऊन काळात गुटखा पुडी, खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा कच्चा माल जोरात विक्री झाला. या काळात याचे दर पूर्वीपेक्षा चौपट वाढले. या साहित्याचा तुटवडा भासू नये म्हणून रात्री व्यावसायिकांपर्यंत माल पोहचविला गेला. तंबाखूच्या आहारी गेलेल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात अद्याप पानठेल्यावर बंदी आहे. यामुळे तंबाखूजन्य पदार्थ विकता येत नाही.अशा स्थितीत स्टेट बँक चौक, बसस्थानक परिसर, माईंदे चौक, दत्त चौक आदी परिसरात काहींनी विक्रीचे स्वरूप बदलले. दत्त चौकात तर काहींनी व्यवसाय बंद करून त्या ठिकाणी दुसरा व्यवसाय सुरू केल्याचे दिसून आले. मात्र बहुतांश पानठेला व्यवसाय करणारे विक्रेते आपले ग्राहक मिळविण्यासाठी दुकान बंद असले तरी त्याच परिसरात वाहनावर फिरत असल्याचे दत्त चौक व स्टेट बँक चौकात आढळले. ग्राहकांपर्यंत खर्रा, गुटखा पुड्या ते नेऊन देतात. त्याचे दर मात्र अधिक असतात. तर काही ग्राहक मेन लाईन, रेल्वे स्थानक, आर्णी रोड, गोधणी मार्ग आदी ठिकाणी विक्रेत्यांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून आले.विशेष ‘कोडवर्ड’ नंतर हा खर्रा घेणारा ग्राहक आहे, हे ओळखले जाते. यानंतर त्याला खर्रा दिला जातो. दुसरा नवीन ग्राहक असेल तर खर्रा नाकारला जातो.दुसºया प्रकारामध्ये बसस्थानक परिसर, मेन लाईन, दारव्हा रोड, आर्णि नाका परिसरात दुचाकी वाहनामध्ये खर्रा लपविला जातो. ग्राहक येताच डिक्की उघडून तेथे खर्रा हमखास मिळतो. छुप्या पद्धतीने विक्री होणाºया तिसºया प्रकारात खर्रा, गुटखा याची मागणी होताच गोपनीय ठिकाणातून खर्रा आणला जात असल्याचे स्टेट बँक चौक, गांधी चौक, बसस्थानक परिसरात दिसून आले.काहींनी आपला व्यवसायच बदलविलापानठेले बंद झाल्याने रोजगाराचे साधन गमावले म्हणून काही व्यावसायिक थांबले नाही. त्यांनी काळाची पावले ओळखत आपला व्यवसायच बदलविला. त्या जागेवर किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कोल्ड्रींक्स, भाजीपाला, मास्क तर काहींनी चहा टपरी अथवा हॉटेल पार्सल असे दुकानाचे नवे स्वरूप तयार केले. यातून आपला नवा व्यवसाय थाटला. मात्र नव्या व्यवसायाच्या आडोशाने त्यांची खर्रा विक्रीही सुरू असल्याचे दत्त चौकात दिसून आले. यामुळे खर्रा सहज उपलब्ध होताना दिसून येत आहे.शौकिनांनी घरीच मशीन विकत घेतल्याखर्रा साहित्य विकत आणून काही ग्राहकांनी घरीच खर्रा घोटण्याची मशीन फिट केली. दिवसभर त्यावर खर्रा घोटून काढला जातो. स्वत:ची हौस पूर्ण केली जाते. यासोबतच ओळखीच्या व्यक्तींना विकला जातो. तंबाखूच्या किमती होलसेल बाजारात वाढल्या नाही. मात्र कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. या वस्तू चौपट महाग विकल्या गेल्या.अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस निद्रिस्तखर्रा आणि गुटख्याचा छुपा व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक फोफावला. मात्र त्याची अन्न व औषधी प्रशासन विभागाला तिळमात्र कल्पना कशी नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाण्यातील बिट जमादारांनी अशा विक्रेत्यांकडून दंड म्हणून मोठी रक्कम वसूल केली. मात्र ती शासनाच्या तिजोरीत गेली नाही. काही विक्रेत्यांनी तर पोलिसांनी चक्क आपल्याजवळून खर्रा साहित्य व तयार खर्रा नेल्याचेही सांगितले. तथापि, खर्रा विक्रेत्यांनीही मात्र लॉकडाऊनचा लाभ घेत दामदुप्पटीने विक्री सुरू ठेवली आहे.