अविनाश खंदारे
फोटो
उमरखेड : येथील नगरपालिकेत २०१६ मध्ये भाजपची अध्यक्ष पदासह एकहाती सत्ता आली. त्यावेळी राज्यात सरकारही भाजपचे होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधीत मिळाला. त्यातून अनेक कामे झाली. आलेला निधी खर्ची घातला. मात्र, शहरातील नवीन वस्ती अद्यापही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.
पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मोहननगर, आनंदनगर, गोकुळनगर, महसूल कॉलनी, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर या भागात रस्ते, वीज, नाल्या यासह इतर मूलभूत सुविधा मिळत नाहीत, अशी नागरिकांची ओरड आहे. पावसाळ्यात नेक भागात रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे साधे पायदळ चालणे कठीण होते.
१ नगरपरिषदेच्या हद्दीत येणारे शहरातील अनेक रस्ते पावसाळ्यात तळ्यांचे रूप घेते. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची समस्या वाढत असताना, नगरपरिषद याकडे वारंवार दुर्लक्ष करताना दिसत आहे.
२ मोकाट श्वान, जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
शहरातील मध्यवस्ती व महामार्गांवर मोकाट श्वानांनी व जनावरांनी आपले स्थान मांडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दररोज छोटे-मोठे अपघात होतात. नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
३ अतिक्रमणामुळे शहराचा गुदमरतोय श्वास
रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. मात्र, पालिका अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या बाजूने चालणेही नागरिकांना अवघड झाले आहे.
४ मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. कचऱ्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने त्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व अनेक रोग उद्भवत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. नगरपरिषद नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.
५ विकासाची कामे निकृष्ट
पालिकेच्या अनेक प्रभागांत रस्ते व नाल्यांची कामे सुरू आहे. या कामांमध्ये वापरले जाणारे साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड होत आहे. परिणामी, नाल्या ढासळत आहेत. विकासाच्या कामात केवळ कंत्राटदारांचा विकास होत असल्याचे चित्र दिसत आहे.