शिंदोला : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय परीक्षेसह बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, नुकताच अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात परीक्षा न देताही बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण मिळाले. त्यामुळे पाहिजे त्या शाखेत पसंतीनुसार प्रवेश घेता येईल, अशी अपेक्षा होती. तथापि, शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी अर्थातच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी ग्रामीण भागासह शहरी भागातील काही प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्र शासनाने यंदा प्रथमच कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून काही निकषांच्या आधारे परीक्षा न घेता निकाल दिला. दरम्यान, शालेय स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. अनेक शाळांच्या शिक्षकांनी नामी संधीचा फायदा घेत सढळ हाताने गुणदान केल्याची शंका व्यक्त होत आहे, तर निवडक शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता डोळ्यासमोर ठेवून गुणदान केल्याचे दिसून येते. बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. नव्हे तर दरवर्षीपेक्षा प्रथम श्रेणीसह प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यामुळे अभ्यासाची आवड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. आता गुणांच्या आधारे आपल्याला पसंतीनुसार पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली. मात्र शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर होताच विद्यार्थ्यांचा आनंद क्षणभंगूर ठरला. सीईटी घेण्याच्या निर्णयामुळे दहावीच्या निकालाला फारसे महत्त्व उरले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता परीक्षा केंद्रांवर २१ ऑगस्टला सीईटी घेतली जाणार आहे. सदर परीक्षा इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर असून, प्रत्येक घटकांवर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी आहे. विशेष म्हणजे सीईटी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशास प्राधान्य मिळणार आहे. अर्थातच सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. तथापि या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनाजोग्या शाखेत किंवा महाविद्यालयातील प्रवेशाबाबतच्या आशेला निश्चितच लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.