पाटणबोरी (यवतमाळ) : पाटणबोरी परिसरात पाळीव जनावरे व मनुष्यांवर सातत्याने हल्ले करणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर बुधवारी सकाळी यश आले. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हल्लेखोर वाघिणीला ट्रँक्यूलाईज करून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिला वनविभागाच्या एका मोठ्या वाहनात जेरबंद करून नागपूर येथे रवाना करण्यात आल्याची माहिती पांढरकवडाचे उपवनसंरक्षक एस.आर.दुमोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या काही दिवसांपासून ही वाघिण पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, कोबई, वासरी शिवार, कोपामांडवी, वा-हा शिवारात अक्षरश: धुमाकूळ घालत होती. या वाघिणीने परिसरातील १० जनावरांना ठार मारले होते. तसेच अंधारवाडीतील लक्ष्मीबाई दडांजे या महिलेवर शेतात हल्ला करून तिला ठार केले होते. सातत्याने घडणा-या घटनांमुळे पाटणबोरी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.
या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. वाढत असलेला वाघ-मानव संघर्ष लक्षात घेता, वनविभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अमरावती येथून स्पेशल फोर्स पाचारण केला होता. सोबतच पांढरकवडा वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारीसुद्धा या स्पेशल फोर्सच्या दिमतीला होते. गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीवर वनविभागाची नजर होती.
मंगळवारी या वाघिणीला जेरबंद करण्याचे अधिकृत आदेश वनविभागाच्या हाती पडताच, वाघिणीला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. बुधवारी सकाळी अंधारवाडी परिसरात ही वाघिण भटकत असताना वनविभागाच्या पथकाने तिला ट्रँक्यूलाईज करून बेशुद्ध केले. वाघिण जेरबंद झाल्याने पाटणबोरी परिसरातील नागरिकांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आणखी बातम्या..
- बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी
- Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन