यवतमाळ : शिक्षक भरतीसाठी ताटकळत असलेल्या अडीच लाख अभियोग्यता धारकांसाठी खूशखबर आहे. आता प्रत्येक मंगळवारी पवित्र पोर्टलवरून पदभरतीच्या अनुषंगाने सर्व कामांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. शिक्षण आयुक्तांनी राज्यभरातील शैक्षणिक कामांसाठी वर्षभराचे ‘टेबल प्लॅनर’ जाहीर केले आहे. त्यात पवित्र पोर्टलच्या कामासाठी मंगळवार निश्चित करून देण्यात आला आहे.
यामुळे शिक्षक भरती होणार की नाही, या संभ्रमाला पूर्णविराम लागला आहे. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलशी संबंधित कामांचा आढावा घेणार आहेत. ही प्रक्रिया जानेवारी ते डिसेंबर अशी वर्षभर चालणार आहे. भरतीची प्रक्रिया कुठवर आली, किती संस्थांच्या जाहिराती आल्या, भरती झाल्यावर काही कायदेशीर बाबी उद्भवल्यास अशा प्रकरणांचा आढावा घेतला जाणार आहे.
वर्षभरातील कामांचे नियोजन असलेली शैक्षणिक दिशादर्शिका आयुक्तालयाने तयार केली आहे. त्यासोबतच ‘टेबल प्लॅनर’ही तयार केले आहे. यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शिक्षकांची बिंदूनामावली, शाळा प्रस्ताव छाननी बैठक, अकरावीची प्रवेश प्रक्रिया, शाळा दर्जा वाढ बैठक, शिष्यवृत्ती कामाचा आढावा बैठक, अनुदान वाटप आढावा, विद्यार्थी लाभाच्या योजनांचा आढावा अशी विविध कामे कोणत्या दिवशी कोणते अधिकारी करणार याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. ही दिशादर्शिका तयार करण्यासाठी योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. शालेय शिक्षण विभागातील कार्यक्रम, योजना, विषय आणि कार्यालयीन कामकाज यात अंतर्भूत करण्यात आले. शिक्षण आयुक्तालय, शिक्षण संचालनालय, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व तीनही शिक्षणाधिकारी यांच्या संपूर्ण वर्षाच्या कामकाजाच्या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत.
बुधवारी, गुरुवारी शाळा तपासणी
या दिशादर्शिकेनुसार, दर सोमवारी कार्यालयीन साप्ताहिक बैठका होणार आहेत. तर पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी क्षेत्रीय अधिकारी, तसेच दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी राज्यस्तरीय कार्यालये आपल्या अधिनस्त कार्यालयांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, बुधवारी आणि गुरुवारी शिक्षणाधिकाऱ्यांना शाळा भेटी करून तपासणी करावी लागणार आहे. शिक्षण आयुक्त, संचालक, उपसंचालक हे कोणत्या दिवशी कोणत्या विभागात दौरा करणार याचेही नियोजन दिशादर्शिकेत देण्यात आले आहे.