अविनाश साबापुरे/ यवतमाळ: एकलव्य माॅडेल स्कूलसाठी केंद्र शासनाने तब्बल चार हजार पदे भरण्याची तयारी केली आहे. मात्र या भरती परीक्षेसाठी केवळ मुंबईतच परीक्षा केंद्र दिले गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विशेषत: विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या आदिवासी जनजातीय कार्य मंत्रालयाने या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध ठिकाणच्या एकलव्य माॅडेल स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी केवळ मुंबईत एकमेव परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया यासारख्या विदर्भातील दुरस्थ परिसरातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पोहोचणे कठीण जाणार आहे.
या परीक्षेला आदिवासी विद्यार्थी दरवेळी मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात. परंतु, मुंबईत परीक्षेसाठी पोहोचताना त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडण्यासोबतच तब्बल आठशे ते हजार किलोमिटरचे अंतर पार करावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, भामरागडसारख्या तालुक्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार किलोमिटरचे अंतर पडणार आहे. त्यामुळे या परीक्षेचे केंद्र महाराष्ट्रातील सर्व विभागात देण्याची गरज आहे.
नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर असून तेथे परीक्षा केंद्र देण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात दिले जात आहे. मग एकलव्य निवासी माॅडेल स्कूलच्या पदभरती परीक्षेचे केंद्र नागपुरात का दिले जाऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कोणत्या जागांसाठी होतेय परीक्षा?- प्राचार्य : ३०३- शिक्षक : २२६६- अकाउंटंट : ३६१- कनिष्ठ सहायक : ७५९- लॅब अटेंडंट : ३७३- एकूण जागा : ४०६२
असंख्य अडचणींचे दिव्य पार करीत आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ पाहात आहे. अशावेळी दूरचे परीक्षा केंद्र देऊन त्यांच्या अडचणीत का वाढ केली जात आहे? मुंबईप्रमाणेच नागपुरातही परीक्षा केंद्र दिले जावे.- प्रा. मधुकर उईके, अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशन