लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : भाजपा नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगला व शैक्षणिक संस्थांमध्ये प्राप्तीकर खात्याने टाकलेली धाड रात्री उशिरापर्यंत चालली. मात्र त्यात नेमके काय सापडले ही बाब गुलदस्त्यात आहे.संजय देशमुख यांच्या दिग्रसमधील घरावर मंगळवारी सकाळी नागपूरच्या २२ सदस्यीय प्राप्तीकर पथकाने धाड घातली होती. त्यांचा बंगला, फार्मसी कॉलेज, सैनिकी शाळा, आश्रमशाळा अशा विविध संस्थांवर एकाचवेळी हे अधिकारी धडकले. मध्यरात्रीपर्यंत प्राप्तीकर विभागाकडून देशमुख यांच्याकडील विविध फाईली व कागदपत्रांची तपासणी सुरू होती. रात्री हे पथक रवाना झाले. दरम्यान, बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या घरी गर्दी केली. दरम्यान, हा रुटीन सर्च असल्याचे देशमुख यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.संजय देशमुख क्रीडा राज्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपाच्या संस्थांचे जाळे निर्माण केले होते. या माध्यमातून शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये स्थापन करण्यात आली. यातील काही संस्था विनाअनुदानित आहेत. या सर्व संस्थांचा हिशेब तपासणीसाठीच ही धाड प्राप्तीकर विभागाने घातल्याचे सांगितले जाते. परंतु धाडीतील नेमका आकडा पुढे आला नाही. तो सांगण्यास प्राप्तीकरच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली.माजी राज्यमंत्र्यांकडील या धाडीने जिल्ह्याच्या राजकीय गोटात खळबळ निर्माण झाली आहे. सत्ताधारी असूनही धाड कशी, हा चर्चेचा विषय आहे. भाजपात गुदमरणारा श्वास, त्यातूनच निघालेला शेतकरी मोर्चा, यातून अप्रत्यक्ष सरकारला झालेला विरोध, घरचा अहेर या बाबीतर प्राप्तीकरच्या या धाडीसाठी कारणीभूत नाहीत ना, असा सूर दिग्रसमध्ये ऐकायला मिळतो आहे. दरम्यान, संजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राप्तीकर विभागाला आम्ही संपूर्ण सहकार्य केले. संस्था-शाळांच्या सर्व फाईली त्यांना दाखविण्यात आल्या. त्यात त्यांचे समाधान झाल्याचे देशमुख म्हणाले.
माजी राज्यमंत्र्यांच्या घरी मध्यरात्रीपर्यंत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 11:50 PM
भाजपा नेते, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या बंगला व शैक्षणिक संस्थांमध्ये प्राप्तीकर खात्याने टाकलेली धाड रात्री उशिरापर्यंत चालली. मात्र त्यात नेमके काय सापडले ही बाब गुलदस्त्यात आहे.
ठळक मुद्दे‘प्राप्तीकर’च्या नागपूर पथकाची धाड : सारे काही ‘गुलदस्त्यात’