लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ / वर्धा : सलग दुसऱ्या दिवशीही विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची कृपादृष्टी झाली. यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली, तर वर्धा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यवतमाळ जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले. यवतमाळसह कळंब, उमरखेड, महागाव या चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये ६७.०३, कळंब ७०.७, उमरखेड ११२.०१ तर महागाव तालुक्यात ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बाभूळगाव तालुक्यात ६०.५, दारव्हा ३२.४, दिग्रस २२.६, आर्णी ५०.६, नेर ३९.१, पुसद ५०.८, वणी १७.२, मारेगाव २४.४, झरी जामणी १३.६, केळापूर २५.५, घाटंजी ४६.१ तर राळेगाव तालुक्यात ३३.८ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यातील काही भागांत पावसाचे पाणी शेतात शिरल्याने उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात बुधवारीही काही भागात दमदार तर कुठे पावसाची रिपरिप सुरू होती. सेवाग्रामच्या मेडिकल चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही परिसरांतील नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहायला लागल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती.