जिल्हा परिषदेचा काभार : प्रशासन प्रमुखाची अशीही तत्परता यवतमाळ : शासकीय सेवेतील महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे असतनाही अनेक महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येते. असा एक प्रकार जिल्हा परिषदेत पुढे आला असून एका परिचर महिलेची खोट्या तक्रारीवरून तडकाफडकी बदली करण्यात आली.जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय पांढरकवडा येथे परिचर म्हणून सदर महिला कार्यरत आहे. त्यांचा यात कार्यालयातील एका चालकासोबत वाद झाला. याची माहिती उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आली. त्यांनी प्रकरण निकाली काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना सांगत सदर महिलेला प्रतिनियुक्तीवर पंचायत समिती घेण्याची विनंती केली. त्यावरून सदर महिलेला पंचायत समितीत रूजू करून घेण्यात आले. दरम्यान चालकाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. उपविभागीय अभियंत्यांनी चौकशी करून तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल दिला. मात्र त्यानंतरही बदली करण्यात आली. चौकशी अहवाल विरोधात नसताना बदली झाल्यामुळे सदर महिलेला जबर धक्का बसला आहे. इतक्या तडकाफडकी दखल घेतल्याने जिल्हा परिषद वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
खोट्या तक्रारीवरून परिचर महिलेची बदली
By admin | Published: January 03, 2016 3:01 AM