आरोपी मोकळेच : काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदनदारव्हा : दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष, आॅल इंडिया हज कमिटीचे सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सैयद फारूक यांच्यावरील हल्ल्याचा जिल्हा काँग्रेस कमिटीने निषेध नोंदविला आहे. फारूक यांच्यावरील हल्लेखोर दोन आठवडे लोटूनही मोकळेच असल्याने त्यांच्या अटकेसाठी गुरुवारी काँग्रेस कमिटीने जिल्हा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, दारव्हा येथील नगराध्यक्ष अशोकराव चिरडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरी सिंहे, अनिल गायकवाड, अरुण राऊत, संतोष चव्हाण, दिनेश गोगरकर, नितीन मिर्झापुरे, सिद्धार्थ गडपायले आदींची उपस्थिती होती. सैयद फारूक यांच्यावर २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता प्राणघातक हल्ला चढविण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नागपुरात उपचार करण्यात आले. मात्र अजूनही पोलिसांनी हल्लेखोरांवर कोणतीच कारवाई केली नाही. या दोषींचा तातडीने शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सैयद फारूक यांच्यावरील हल्ल्याचा विविध संघटनांनी निषेध नोंदविला आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे नेमके आरोपी कोण, त्यांना अभय कुणाचे, हल्ल्यामागील नेमके कारण काय हे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन आठवडे लोटूनही पोलीस तपासात काहीच प्रगती नसल्याने फारूक समर्थकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)
माजी नगराध्यक्षांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध
By admin | Published: April 08, 2016 2:22 AM