लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोरगरिबांना उपचार मिळावे, म्हणून रात्रन्दिवस झटणारा ‘तो’ कार्यकर्ता. पण इतरांसाठी जीवाचे रान करणाऱ्या या सेवकाला मृत्यूने दगा दिला. शासकीय रुग्णालय परिसरात सतत सेवक म्हणून झटणारा ओम चव्हाण गुरुवारी अचानक हृदयाघाताने कायमचा गेला. रुग्णांसाठी धावणारा हा सेवक रुग्णालयातच थांबला.स्वप्नील ऊर्फ ओम मंगल चव्हाण (३२) रा. प्रणील सोसायटी वाघापूर असे त्याचे पूर्ण नाव. गुरुवारी सकाळी शासकीय रुग्णालयात हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाला. चांगला फुटबॉलपटू म्हणूनही तो परिचित होता. गरीब रुग्णांची संपूर्ण जबाबदारी उचलून उपचार वेळेत मिळावा यासाठी तो सतत डॉक्टरांकडे पाठपुरावा करायचा. अनेक निराधार व अनोळखी व्यक्तींना त्याच्या धडपडीनेच नवे जीवन मिळाले.मुलांनी घराबाहेर काढून दिलेल्या बेवारस वृद्धांचीही ओमने सेवा केली. रुग्णालयात सुश्रृशा करून नंतर त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करून दिली. या कार्यामुळेच त्याला युवा सेनेचे यवतमाळ तालुका प्रमुखपद मिळाले. रुग्णालयातील समस्येबाबत प्रशासनाशी भिडण्याकरिता तो तत्पर असायचा. अडचणीच्या प्रसंगी येथील कर्मचारी, डॉक्टरांनाही मदत करायचा.बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही अडचणीत असलेल्या व्यक्तीला खुल्या दिलाने मदत करत होता. अनेक बेवारसांवर त्याने स्वखर्चातून अंत्यसंस्कार केले. त्यामुळेच ओमची अकाली ‘एक्झीट’ अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. त्याच्या मागे पत्नी चेतना, दीड वर्षाचा मुलगा प्रतिक, आणि आई-वडील असा परिवार आहे.
रुग्णसेवकाची रुग्णालयातच ‘एक्झिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:00 PM
गोरगरिबांना उपचार मिळावे, म्हणून रात्रन्दिवस झटणारा ‘तो’ कार्यकर्ता. पण इतरांसाठी जीवाचे रान करणाऱ्या या सेवकाला मृत्यूने दगा दिला.
ठळक मुद्देओम चव्हाण : हृदयाघाताने अकाली मृत्यू, अनेकांच्या काळजाला लावून गेला चटका