थेट बांधावर भेट : आणेवारीवर शेतकऱ्यांशी चर्चा पांडुरंग भोयर - सोनखास यवतमाळ जिल्ह्यातील उद्ध्वस्त शेतीची खुद्द अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी गुरुवारी पाहणी केली. आयुक्त थेट शेतीच्या बांधावर पोहोचले. त्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून आणेवारीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या दुरावस्थेवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. ‘कायले छापता शेतकऱ्यांची थट्टा’ अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे आॅन द स्पॉट वृत्त डझनावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांसह गुरुवारी ‘लोकमत’मध्ये उमटले. या वृत्ताची दखल घेत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर सकाळीच यवतमाळ जिल्ह्यात अकस्मात दाखल झाले. त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करताच सुरुवातीला वटफळी व नंतर कोलुरा येथे शेतीला भेटी दिल्या. त्यानंतर ते उत्तरवाढोणा, सोनखास, लासीना येथील शेतात पोहोचले. त्यांनी उद्ध्वस्त सोयाबीन शेतीची पाहणी केली. कपाशीच्या बोंडांचे वजन, पिकाची स्थिती तपासली. सोयाबीन, कापसासोबतच ज्वारी व इतर भाजीपाला पिकांचीही आयुक्तांनी पाहणी केली. शेतीची उद्ध्वस्त स्थिती पाहून तेही चिंतातूर झाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. शेतकऱ्यांनीही मनमोकळ्यापणे आपल्या व्यथा मांडल्या. जिल्ह्याची सरासरी नजर आणेवारी ५४ टक्के जाहीर झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविला. कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी याचे प्रत्यक्ष उत्पादन घटले आहे. दुबार-तिबार पेरणी करूनही पीक हातचे गेले, उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही, अशी व्यथा मांडण्यात आली. कोरडवाहू शेतकऱ्यांसारखीच अवस्था ओलिताच्या शेतीची झाली आहे. या शेतकऱ्याकडे पाणी आहे पण त्याच्या उपशासाठी वीज नाही. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कपाशीचे पीकही हातचे जाण्याची चिन्हे आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांची हीच अवस्था असून शासनाने आर्थिक मदत, दिलासा न दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती यावेळी संजय देवकते, मुरलीधर ठाकरे, प्रमोद धोबे, गजानन दिवेकर, अभय शेंडगे या शेतकऱ्यांनी आयुक्तांपुढे बोलून दाखविली. यावेळी संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाचे स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांच्या सोबतीला उपस्थित होते. आयुक्तांसोबत दारव्हा एसडीओ मनोहर कडू, कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, नेरचे प्रभारी तहसीलदार ताकसांडे, बीडीओ भगत, दारव्हा येथील उपविभागीय कृषी अधिकारी द.रा. कळसाई, नेरचे तालुका कृषी अधिकारी एम.एन. झंझाळ, दारव्हा येथील नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलवार, यवतमाळचे तहसीलदार अनुप खांडे, कृषी अधिकारी नाईक, नायब तहसीलदार राठोड उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांकडून उद्ध्वस्त शेतीची पाहणी
By admin | Published: November 06, 2014 11:02 PM