यवतमाळ : चालु शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्वपुर्ण निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालये आणि हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी परिषदेचे सदस्य वसंत घुईखेडकर यांच्यासह ईतर सदस्यांनी प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर त्याला कुलगुरुंनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.
दरवर्षी महाविद्यालयीन प्रवेशासाठी आँगष्ट महीन्याच्या पहील्या सोमवारपर्यंत मुदत असते. परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले नाही. त्याचबरोबर ईतरही शैक्षणिक कामकाज अडचणीत आले आहे. ही परिस्थिती बघता चालू शैक्षणिक सत्राकरिता विद्यापीठाने प्रवेशासाठी आगोदरच ३१ आँगष्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर सुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महाविद्यालयात नवीन प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. याबाबत विद्यापीठ व्यवस्थापण परिषदेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर कुलगुरुंनी प्रवेशाकरिता ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे मुदतवाढीचा निर्णय कळविला.
कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला. महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियासुध्दा रखडली होती. विद्यापीठाने प्रवेशाची मुदत वाढविल्याने चांगला फायदा होईल.- वसंत घुईखेडकर, सदस्य, अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद