लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने ३ हजार ७३५ शिक्षकांना बदल्यांचे आदेश देऊन तडकाफडकी नव्या शाळेत रूजू करून घेतले. कोणत्या शिक्षकाने कोणाला ‘खो’ दिला, याचा साधा सुगावाही लागू देण्यात आला नाही. परंतु, अन्यायग्रस्त गुरुजींनी लोकप्रतिनिधींच्या हाताने प्रशासनाचे नाक दाबून ‘बोगस लाभार्थ्यां’ची यादी मिळविलीच. यादी मिळताच एक हजार बदल्या संशयाच्या सावटात आल्या असून अन्यायग्रस्त शिक्षक पुरावे गोळा करण्याच्या कामाला भिडले आहेत.बदल्यांमध्ये विस्थापित होऊन मनाविरुद्ध २० शाळांचा पसंतीक्रम भराव्या लागलेल्या शिक्षकांनी संपूर्ण बदल्यांची यादी प्रशासनाला मागितली होती. परंतु, बदल्यांची प्रक्रिया ग्रामविकास मंत्रालयाने केल्याने जिल्हा परिषदेला यादी देता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. या विरोधात संघर्ष समिती स्थापन करून अन्यायग्रस्त शिक्षकांनी ६ जूनपासून उपोषण सुरू केले होते. दरम्यान, ग्रामविकास विभागाने यादी नाही पण निदान प्रत्येक शिक्षकाचा बदली आदेश जाहीर करण्याचा आदेश दिले. हा आदेशही जिल्हा परिषदेने झुगारला.अखेर संघर्ष समितीने पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे हा प्रश्न मांडला. तब्बल २० दिवस उपोषण केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अन्यायग्रस्त शिक्षकांना बोलावण्यात आले. तेथे पालकमंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची बैठक घेतली. संवर्ग एक आणि दोनमधून बदली करून घेणाऱ्या शिक्षकांची यादी दोन दिवसात शिक्षकांना उपलब्ध करून द्या, असा आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी दिला. त्यानंतर बुधवारी ही यादी शिक्षकांना देण्यात आली.एकंदर ११०१ शिक्षकांनी संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधून बदली करून घेतल्याचे यादीवरून स्पष्ट झाले आहे. त्यातील एक हजार शिक्षकांनी बदलीसाठी खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा अन्यायग्रस्तांचा दावा आहे.विशेष म्हणजे, यापूर्वीच अन्यायग्रस्तांनी २५० पेक्षा अधिक ‘बोगस लाभार्थ्यां’ची तक्रार पुराव्यासह प्रशासनाकडे केली आहे. आता यादीतील इतरही ‘संशयास्पद’ शिक्षकांविरुद्धचे पुरावे गोळा करण्यासाठी अन्यायग्रस्त कामाला लागले आहेत.२०० शिक्षकांची नावे दडविल्याचा संशयप्रशासनाने संवर्ग एक आणि दोनच्या ११०१ बदल्यांची यादी अन्यायग्रस्तांना दिली. परंतु, यात काही नावे जाणीवपूर्वक दडविण्यात आली, असा आरोप संघर्ष समितीचे गजानन पोयाम यांनी केला आहे. प्रत्यक्षात ही यादी १३०० ते १४०० नावांची आहे. मात्र, आम्ही यापूर्वीच ज्यांची नावासह आणि पुराव्यासह तक्रार केली, अशी नावे यादीत देण्यात आली नसावी, असाही आरोप त्यांनी केला. आता केवळ यादी आली, आता बोगस लाभार्थ्यांवर प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत संघर्षग्रस्त समिती शांत बसणार नाही. जिल्हा परिषदेने कारवाई न केल्यास येत्या शिक्षक दिनी जिल्हा परिषदेपुढे धरणे देऊन बोगस शिक्षकांना उघडे पाडू, असा इशाराही देण्यात आला.
एक हजार शिक्षक बदल्यांवर आंदोलकांची ‘नजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 10:35 PM
जिल्हा परिषदेने ३ हजार ७३५ शिक्षकांना बदल्यांचे आदेश देऊन तडकाफडकी नव्या शाळेत रूजू करून घेतले. कोणत्या शिक्षकाने कोणाला ‘खो’ दिला, याचा साधा सुगावाही लागू देण्यात आला नाही. परंतु, अन्यायग्रस्त गुरुजींनी लोकप्रतिनिधींच्या हाताने प्रशासनाचे नाक दाबून ‘बोगस लाभार्थ्यां’ची यादी मिळविलीच.
ठळक मुद्देपुराव्यासह तक्रारी : २० दिवसांच्या उपोषणानंतर दिली जिल्हा परिषदेने यादी