लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात म्युकरमायकोसिस बुरशी संसर्गाचा धोका कायम आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्वतंत्र वाॅर्डात दररोज रुग्ण दाखल होत आहेत. आतापर्यंत ४७ जणांची तपासणी केली, यापैकी ३५ जणांना हा आजार आढळून आला. कोरोनाग्रस्त असलेल्या तीन जणांचा यात मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन आलेल्या चार रुग्णांचे डोळे तेथे काढण्यात आले.शासकीय रुग्णालयात आतापर्यंत २५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात नाक व आतील भाग काढावा लागला. जबड्याचा टाळू काढला. ही शस्त्रक्रिया सध्या यशस्वी झाली असून, हे रुग्ण हळूहळू बरे होत आहेत. ज्यांना मधुमेह हा आजार आहे व ज्यांचे वय ५०च्यावर आहे. अशा सर्वांनीच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये ५०पेक्षा कमी वय असलेल्या आठ जणांचा समावेश आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस हा कुठल्याही वयात धोकादायक आहे. वैयक्तिक स्वच्छता आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, हेच या आजारावरचे प्रभावी औषध आहे. नंतरचा उपचार हा अतिशय क्लिष्ट आहे.
औषधींचा पुरेसा साठा कधी मिळणार? सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजारावरील औषधे उपलब्ध नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना नागपूर येथून औषधे आणावी लागली. काही रुग्णांनी तर नागपूर, औरंगाबाद येथे जाऊन उपचार घेतले. लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी इंजेक्शन, पोसोकोनाझोल टॅब्लेट यासह अन्य औषधींचा जिल्ह्यात सुरुवातीला तुटवडा होता. आता जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा असून, खासगी व शासकीय रुग्णालयातील मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, अजूनही दरदिवसाला तीन ते चार रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत असल्याने औषधांची मागणी वाढत आहे.
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. ही बुरशी सर्वप्रथम नाका - तोंडातून शरीरात प्रवेश करते. यातून संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला आधी सर्दी होऊ शकते. नाकाला व घशात सूज येऊन वेदना जाणवू लागतात. ताप व सायनोसायटिस सारखा त्रास झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. हिरड्यांवर सूज, पक्के दात अचानक पडणे, गाल बधीर वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. गाल, डोळे व दात दुखणे. असह्य डोकेदुखी, नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा, चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना, डोळा लाल होणे, दृष्टी कमी होणे, नाकातून रक्त येणे, ही लक्षणे आहेत. योग्य निदान व उपाययोजना झाल्यास वेळीच या जंतूंचा फैलाव थांबू शकतो.
दररोज नवीन रुग्ण दाखल होत आहेत. म्युकरमायकोसिस आजारावर मेडिसीन, नेत्ररोग, इएनटी, बधिरीकरण, दंत तज्ज्ञ या सर्वांच्या मदतीनेच उपचार करता येतो. आता दररोज रुग्ण वाढत आहेत. हे प्रमाण सध्या नियंत्रणात आहे. मात्र, कोविडची लाट आल्यास म्युकरमायकोसिसचा धोका आणखी वाढण्याची भीती आहे. - डाॅ. सुरेंद्र गवार्ले, विभाग प्रमुख नाक-कान-घसा
ही घ्या काळजी
आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जबडा, दात यांची नियमित स्वच्छता, बिटाडीन किंवा गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास संसर्गाचा धोका टळतो, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहार, आराम, जीवनसत्त्वांचे सेवन करावे.
दहा रुग्ण ठणठणीत होऊन गेले घरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्यूकरमायकोसिसचे आतापर्यंत ४७ रुग्ण दाखल झाले. योग्य उपचारामुळे दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यापैकी सात जणांना सुटी झाली आहे. तीन जणांना लवकरच सुटी दिली जाणार आहे. दर दहा दिवसांनी रुग्णांची तपासणी केली जाते. त्याच्यात बुरशीचा संसर्ग आढळल्यास उपचार सुरू ठेवावे लागतात. संसर्ग कमी झाल्यास रुग्णांना सुटीचा निर्णय घेतला जातो.