यवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने यवतमाळातून बाजारपेठ बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, येथील मारवाडी चौकात बंद समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघाच्या नेतृत्त्वात यवतमाळ जिल्हा बंदचे आवाहन केले गेले. त्यात ३५ संघटनांनी पाठिंबा देत सहभाग नोंदविला. जिल्हाभर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे. सकाळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरातील व्यापारपेठ बंद करीत मारवाडी चौकात पोहोचले. यावेळी तेथील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. हे क्षेत्र भाजप समर्थकांचे असल्याने काहींनी दुकाने बंद ठेवण्यास नकार दिला. यावेळी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विरोधक व समर्थक रस्त्यावर उतरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यवतमाळ शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी ताफ्यासह वेळीच घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटांची समजूत काढली. त्यामुळे तणाव निवळला.