यवतमाळ : साेशल मीडियावर काेण काय करेल याचा नेम राहिला नाही. एका अज्ञाताने चक्क यवतमाळ जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडले. यासाठी त्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या फाेटाे व नाव याचा वापर केला. हा गंभीर प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी पाेलिसांत तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी अज्ञाताविराेधात आयटी ॲक्टचा गुन्हा दाखल केला आहे.
साेशल मीडियाचे अकाऊंट हॅक करून फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्यांना अडचण सांगून पैसे मागण्याचा प्रकार नेहमीच घडत असताे. जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांना त्याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने फेसबुक अकाऊंट तयार केल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: फेसबुकवर पाेस्ट करत इतरांना याबबतची माहिती दिली. अशा अकाऊंटला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. याची चाैकशी करून दाेषींवर कारवाई व्हावी यासाठी यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.
सायबर टीम फेक अकाऊंट उघडणाऱ्यांचा शाेध घेत आहे. प्राथमिक माहितीनुसार फेक अकाऊंट उघणाऱ्याने बिलासपूर येथील पत्ता टाकला आहे. असे अकौंट तयार करणारा काेण याचा शाेध सायबर टीम घेत आहे. यासाठी आवश्यक माहिती फेसबुकडे मागितली आहे. त्यानंतर आराेपी ओळख पटवून त्याला अटक केली जाईल, असे सायबर सेलचे प्रभारी विकास मुंढे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.