यवतमाळ : माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदाताई पवार, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरना भेट दिली. तेथील उपलब्ध सोयींची पाहणी केली. त्यानंतर कोविड सेंटरच्या सुविधा वाढवाव्यात, असे निर्देश प्रशासनाला दिले.
आमदारांसह अध्यक्षांनी कोरोना रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. रुग्णांनी मिळणाऱ्या जेवणाबाबत दिलेल्या माहितीवरून व माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी सुचविलेल्या बाबीनुसार कालिंदाताई पवार, श्रीधर मोहोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मंगळवारी (दि. ४) भेट घेतली.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहता कोविड केअर सेंटरमधील बेड क्षमता वाढविणे, मुबलक प्रमाणात औषधसाठा पुरविणे, रुग्णांच्या जेवणाचा दर्जा सुधारणे, सकाळी नाष्ट्यामध्ये प्रथिनेयुक्त आहार देण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय रुग्णांच्या करमणुकीसाठी सर्वच कोविड सेंटरमध्ये दूरदर्शन संच, वायफाय सुविधा लावण्यात याव्यात, वाचनासाठी वृत्तपत्रेही ठेवावीत, ऑक्सिजन कमी होत असलेल्या रुग्णांना प्राथमिक स्वरूपात ऑक्सिजन पुरवठा होईल, या दृष्टीने प्रत्येक सेंटरला १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे.