लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : निरागस विद्यार्थी प्रदीप शेळके याच्या खुनाचा शोध घेण्यासाठी सहा अधिकारी आणि १५ कर्मचारी ढाणकीत तळ ठोकून असले, तरी अद्याप ना कारणाचा थांगपत्ता लागला, ना आरोपींचा. पोलीस दररोज वेगवेगळ्या बाजूंनी तपास करून संशयितांना ताब्यात घेतात आणि सोडून देतात. चार दिवसांपासून मारेकरी शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे.तालुक्यातील ढाणकी येथील अनुदानित आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रदीप संदीप शेळके (७) याचा सोमवारी शाळेपासून ५०० फूट अंतरावर कोरड्या तळ्यात मृतदेह आढळला. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अमरावती येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या श्वानाने शाळेपर्यंतचा माग दाखविला. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. परंतु काहीही हाती लागले नाही. नंतर बुधवारी पुजाºयाच्या बयाणावरून आठ जणांना ताब्यात घेतले. मात्र त्यांनाही नंतर चौकशीअंती सोडून देण्यात आले.नेमका प्रदीपचा खून कोणत्या कारणासाठी झाला, मारेकरी कोण, याचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी ढाणकीत तळ ठोकून आहेत. पोलीस नवनवीन पद्धतीने शोध घेत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी यापूर्वी बिटरगावला ठाणेदार असलेले आणि सध्या जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत ज्ञानोबा देवकते यांनाही तेथे चौकशीसाठी पाठविले आहे.
प्रदीपचे मारेकरी शोधण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:41 AM
निरागस विद्यार्थी प्रदीप शेळके याच्या खुनाचा शोध घेण्यासाठी सहा अधिकारी आणि १५ कर्मचारी ढाणकीत तळ ठोकून असले, तरी अद्याप ना कारणाचा थांगपत्ता लागला, ना आरोपींचा.
ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : ढाणकी विद्यार्थी खूनप्रकरण