यवतमाळ : एकदा दहावीत किंवा बारावीत नापास झाला म्हणजे आयुष्यच वाया गेले, असा गैरसमज करून घेऊन अनेक विद्यार्थी नाराज होतात. पण त्यांच्यासाठीही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. नेमक्या याच संधीची माहिती देण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी जिल्हाभरात कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
परीक्षेमध्ये विशिष्ट क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते व्यवसाय, कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठवून सूचना दिली आहे. कार्यशाळेला आपल्या शाळेतील विशिष्ट क्षमता प्राप्त न केलेले सर्व विद्यार्थी उपस्थित ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ आणि आर्णी तालुक्यातील विद्यार्थ्यांना किशोर बनारसे आणि प्रशांत पंचभाई मार्गदर्शन करणार आहेत. नेर-दारव्ह्यातील विद्यार्थ्यांना वैभव देशमुख, विनोद राठोड, तसेच पुसद-दिग्रसच्या विद्यार्थ्यांना अजय खैरे, पंजाब चंद्रवंशी, उमरखेड-महागावच्या विद्यार्थ्यांना प्रमोद देशमुख, योगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळेल. तर पांढरकवडा-घाटंजीच्या विद्यार्थ्यांना प्रवीण वानखेडे, ज्ञानेश्वर डाबरे मार्गदर्शन करतील. वणी, मारेगाव व झरीच्या विद्यार्थ्यांना रघुनाथ मोहीते, अभय पारखी, नहाते मार्गदर्शन करतील. राळेगाव, कळंब व बाभूळगावातील विद्यार्थ्यांना अविनाश रोकडे, इंगोले, शंकर मोहुर्ले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कोणत्या तालुक्यात किती नापास?यवतमाळ तालुक्यात ६९६ नापास विद्यार्थी आहेत. तर र्णी २९८, नेर १३२, दारव्हा ३४२, पुसद ६४५, दिग्रस ३७७, उमरखेड ५२८, महागाव २९३, घाटंजी २८६, पांढरकवडा ३८२, वणी ६१०, मारेगाव १५५, झरी १४८, राळेगाव २५६, कळंब २३९ आणि बाभूळगाव तालुक्यातील १३७ विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा होणार आहे.