यवतमाळ : कामावर येण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना पायघड्या घातल्या जात असतानाच मोठा धक्का देणारे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे संपातून बाहेर पडून कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. शिवाय कामावर जाण्याच्या मानसिकतेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरम्यान, व्हायरल झालेले परिपत्रक खोटे असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
एसटीचे शासनात विलीनीकरण शक्य नाही, असे जाहीर झाल्यानंतर संपात असलेले कर्मचारी आणखी तणावात आले. ५० हजारावर कर्मचारी आजही संपावर आहेत. काही कर्मचारी रुजू होत आहे. महामंडळानेही त्यांना संधी दिली आहे. सुरुवातीला ८० हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यातील २५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर परतले. या कर्मचाऱ्यांसह पुन्हा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असे परिपत्रक महामंडळाने प्रसारित केले.
महामंडळाच्या या परिपत्रकांवर मोठा अटॅक करणारे ७.३.२०२२ अशी तारीख आणि महाव्यवस्थापक माधव काळे यांची स्वाक्षरी असलेले परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित झाले. एसटीच्या सर्व विभागीय कार्यालयाच्या नावाने असलेल्या या परिपत्रकाने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. २९.१०.२०२१ पासून १०.३.२०२२ पर्यंत जे कर्मचारी बेकायदेशीर संपात सहभागी होते, त्या सर्व कर्मचाऱ्यांवर पुढे शिस्त व आवेदन कार्यपध्दतीनुसार प्रमादीय कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना या परिपत्रकातून करण्यात आल्या होत्या.
परिपत्रक वाचण्यात येताच कर्मचाऱ्यांमध्ये घाबरगुंडी उडाली. त्यांनी एकमेकांशी संपर्क सुरू केला. हा विषय महामंडळाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचताच तातडीने स्पष्टीकरण करण्यात आले. तसे पत्र एसटीने सोशल मीडियावर प्रसारित केले. संपकाळात काही लोकांकडून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात असल्याने महामंडळ त्रस्त झाले आहे.
कोणतीही कारवाई होणार नाही
कामावर हजर झालेल्या कोणत्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही. कर्मचाऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर संभ्रम निर्माण करून त्यांना कर्तव्यावरून परावृत्त करण्यासाठी अज्ञात व्यक्ती किंवा अथवा समूहाने खोट्या परिपत्रकाचा प्रकार केला आहे. तशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलिसात दाखल करण्यात आली आहे. १० मार्च २०२२ पर्यंत कामगिरीवर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटीचा मानस नाही, असे महामंडळाने या खोट्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.