पुसद (यवतमाळ) :गुजरातमधून बनावट रासायनिक खत आणून परिसरातील शेतकऱ्यांना विकण्याचा डाव कृषी विभागाच्या पथकाने उधळून लावला. पुसद शहरातील शंकरनगर भागात झालेल्या या कारवाईत तब्बल १० लाख २४ हजार ३६० रुपयांचा बनावट खताचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणात कृषी केंद्र संचालक गजानन माधव सुरोशे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
येथील केशव कृषी केंद्राचे संचालक गजानन माधव सुरोशे यांच्या राहत्या घरात अनधिकृतपणे खताची साठवणूक केली असून, तेथून विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यावरून कृषी विभागाच्या पथकाने ३० ऑगस्टच्या रात्री सुरोशे यांच्या घरी धाड टाकली. ही कारवाई ३१ ऑगस्टच्या रात्री १ वाजता संपली. या धाडीत बनावट खतांचा मोठा साठा कृषी विभागाने जप्त केला. यात ८३० खताच्या बॅगा आढळून आल्या. त्यांची किंमत १० लाख २४ हजार ३६० रुपये एवढी आहे.
तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, महागावचे कृषी अधिकारी अतुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहरातील शंकरनगर भागात ही कारवाई करण्यात आली. गजानन सुरोशे यांच्या घराची तपासणी केली असता घटनास्थळावर खताच्या बॅगा मोक्यावर मिळाल्या. यामध्ये अपेक्स गोल्ड पावडर ५०,
कालापकीग (अग्रो इंडस्ट्रीज) ७८ बॅगा आहेत. त्यांची किंमत ६१ हजार ६२० एवढी आहे. ९२ हजारांच्या अपेक्स दाणेदार उदरक-फॉस्फेट सोल्यूबलायझिंगच्या (फंगल बायो फर्टिलायझर स्पोअर काऊट) ८० बॅगा सापडल्या. ६ लाख २५ हजारांच्या नवरत्न पार्टन मोदीलायझिंग बायोफर्टिलायझरच्या ५०० बॅगा जप्त करण्यात आल्या. एक लाख १३ हजार ४९० रुपये किमतीच्या अक्ससूर सिलीकॉन नैचरल बैंगजनच्या ९७ बॅगा ताब्यात घेण्यात आल्या. ५० हजारांच्या इनरीज औरंगनिक मैन्यूअरच्या ४० बॅगा आणि ८२ हजार २५० किमतीच्या ३५ बॅगा आढळल्या. याप्रमाणे सुरोशे यांच्या घरातून अनधिकृत साठवलेले ८३० प्लास्टिक बॅगा पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या.
खत गुजरातमधून आल्याची दिली कबूली
याबाबत आरोपीला विचारणा केली असता सदर खत गुजरातवरून येत असल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणात तालुका कृषी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सुरोशे याच्या विरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६३, ४६८,३४, तसेच रासायनिक खते (नियंत्रण) आदेशानुसार कलम ७,१९,२१, अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार कलम ३(२)(डी), १९ (सी) (२), १९ (सी) (५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.