संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तिहेरी अपघातानंतर रात्रभर कोणतीही मदत मिळाली नसल्याने पुण्याच्या एका कुटुंबातील नऊ जणांना अख्खी रात्र अंधारात खितपत काढावी लागली. ही घटना नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडका ते काऊरवाडी दरम्यान घडली. खडका व काऊरवाडीच्या नागरिकांनी या अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री ११.३० वाजता माहूरवरून तवेरा वाहन पुण्याकडे जात होते. त्या पाठोपाठ भरधाव स्वीफ्ट कार होती. तर त्याच दरम्यान एक दुसरी स्वीफ्ट कार आली. या तीन वाहनांचा खडका ते काऊरवाडी दरम्यान अपघात झाला. सिद्धार्थ केंद्रे, अरुण जाधव रा. टाकळी गंभीर जखमी झाले. त्यांना पुसदच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पुणे येथील संदीप भारत शिंदे, कुलदीप भारत शिंदे, मुद्रिक भारत शिंदे, भारत व्यंकट शिंदे, अनिल मारुती शिंदे, पल्लवी संदीप शिंदे, पूजा कुलदीप शिंदे, प्राची, प्रतीक कुलदीप शिंदे यांच्या वाहनात अपघातामुळे बिघाड झाल्याने रात्रभर त्यांना अपघातस्थळीच रहावे लागले. अख्खे कुटुंब रात्रभर या ठिकाणी जागे होते. अपघातानंतर अनेकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. परंतु सोमवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत कुणीही घटनास्थळी पोहोचले नाही. त्यामुळे या अपघातग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान खडका येथील डॉ. संदीप शिंदे आणि काऊरवाडी येथील विष्णू लेवाळकर यांनी अपघातग्रस्त पुणेकरांना मदत केली. जखमींना दवाखान्यात दाखल केले. मात्र या कुटुंबाने रात्र वाहनाजवळ जागून काढली. पोलिसांच्या या संवेदनशून्यतेचा संताप व्यक्त होत आहे.
अपघातस्थळी पुण्यातील कुटुंबाने काढली रात्र जागून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 10:01 PM
तिहेरी अपघातानंतर रात्रभर कोणतीही मदत मिळाली नसल्याने पुण्याच्या एका कुटुंबातील नऊ जणांना अख्खी रात्र अंधारात खितपत काढावी लागली.
ठळक मुद्देखडका-काऊरवाडी रस्त्यावरील घटना : पोलिसांच्या संवेदनशून्यतेमुळे नागरिक संतापले, गावकऱ्यांची मदत