जागतिक आदिवासी दिन : दऱ्याखोऱ्यात जमातींचे वास्तव्यगडचिरोली : राज्याच्या अंतिम टोकावर छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज बहुसंख्य आहे. आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यात वास्तव्यास असून अजूनही समाज पारंपरिक पध्दतीने जीवन जगत आहे. काही भागातील समाज पुढारलेला असला तरी अनेक भागातील आदिवासी समाज आजही विकासापासून दूर आहे. आदिवासी समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने तसेच संपूर्ण जगाचे आदिवासी समाजाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत १९९४ मध्ये ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आदिवासी समाजातील शैक्षणिक मागासलेपण, अनारोग्य यासह विविध समस्या मार्गी लावण्याच्या हेतूने आदिवासी दिन पाळला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात बडा माडिया, माडिया गोंड, राजगोंड, परधान यासह अनेक जमातींचा आदिवासींमध्ये समावेश आहे. जमातींची लोकसंख्या जिल्ह्यात बहुसंख्य आहे. त्यामुळे राज्यात गडचिरोली जिल्ह्याची आदिवासीबहूल जिल्हा म्हणून ओळख आहे. मात्र जिल्ह्याचा विकास अद्यापही प्रगतिपथावर आला नाही. आदिवासी जमातींनी आजही आपली संस्कृती, धार्मिक परंपरा, रूढी कायम ठेवल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्याची ओळख राज्यात सांस्कृतिकदृष्ट्या तसेच भौगोलिकदृष्ट्या विशेषत्वाने निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
आदिवासीबहुल म्हणून राज्यातील परिचित जिल्हा
By admin | Published: August 09, 2015 1:33 AM