डोळा सागवानावर : संगनमताने तस्करीत वाढसोनखास : चंदनासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्रातील उमर्डा नर्सरी प्रसिद्ध आहे. परंतु तस्कर आणि वन अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने येथील चंदन नामशेष झाले आहे. आता तस्करांचा डोळा शिल्लक राहिलेल्या सागवानावर आहे. येत्या काही वर्षात उरले सुरले सागवानही गायब होणार, अशी शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपूर्वी वन विभागातील एका होतकरू अधिकाऱ्याने उमर्डा नर्सरी येथे चंदनाची हजारो झाडे लावली होती. त्याचे संगोपनही व्यवस्थितरित्या करण्यात आले होते. मात्र चंदनाची झाडे मोठी होताच त्यावर तस्करांची वक्रदृष्टी पडली. चंदन तस्करीमधून लाखो रुपयांची कमाई तस्करांनी केली. उमरठा नर्सरीमधील चंदन परराज्यातील तस्करांनी तोडून नेले. यामध्ये अनेक तस्कर वन विभागाच्या हातीही लागले. मात्र तस्करांनी अधिकाऱ्यांनाही आपल्या जाळ्यात ओढून पाहता पाहता संपूर्ण चंदन नष्ट केले. सध्या स्थितीत उमरठा नर्सरीत काही मोजकीच चंदनाची झाडे शिल्लक आहे. हे सर्व चंदन वन विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच तस्करांनी नष्ट केले. सध्या यवतमाळ व परिसरात फार मोठ्या क्षेत्रामध्ये सागवान वृक्ष आहे. या सागवानाची तस्करीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गेल्या तीन महिन्यात तस्करीच्या मोठ्या घटना घडल्या आहे. यामध्ये वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सामिल असल्याने प्रकरणाची चौकशी पारदर्शकपणे होत नाही. त्यामुळेच तस्करांचेही फावत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास उमरठा नर्सरीच नव्हेतर जिल्हाभरातूनच सागवान वृक्षांचा नायनाट होण्याची शक्यता आहे. वृक्षतोडीने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून वृक्षतोड गुन्हा आहे, तरीही शासन व वन विभागाचे अधिकारी गुन्हेगारांच्या बाबतीत मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसते. यवतमाळ, लासीना, सोनखास या परिसरात तस्करांकडून मालकी सर्वेनंबरमधील सागवान मोठ्या प्रमाणात तोडले जात आहे. त्यासोबतच वन विभागाच्या हद्दीतील सागवान तोडून परस्पर विकले जात आहे. गेल्या काही दिवसात लासिना (टेकडी), पिंपरी इजारा, जांबवाडी व चिचबर्डी परिसरातून मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी झाली. तस्कर मात्र अजूनही मोकाट आहेत. शासनाने या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
प्रसिद्ध उमर्डा नर्सरीतील मौल्यवान चंदन नामशेष
By admin | Published: November 16, 2015 2:20 AM