पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्यातील माळपठारावरील पांढुर्ण खुर्द शेतशिवारात बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला, यावेळी अंगावर वीज पडून एक शेतमजूर जागीच ठार झाला तर एक शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मनोहर बदू चव्हाण 40 रा पांढुर्ण हे मृतकाचे नाव असून शोभाबाई दत्ता राठोड 35 हे गंभीर जखमी झालेल्या शेतमजूर महिलेचे नाव आहे. पुसद तालुक्यातील माळपठारावरील पांढुरणा खुर्द शेतशिवारात अचानक आकाशात काळे ढग दाटून आले व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला, त्याचवेळी साहेबराव राठोड यांच्या शेतात सोयाबीन काढणीचे काम करीत असलेले मनोहर चव्हाण व शोभाबाई राठोड यांच्या अंगावर वीज कोसळली, यामध्ये मनोहरचा जागीच मृत्यू झाला तर शोभाबाई यांचे शरीर भाजल्याने त्यांना पुसद येथे एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मनोहर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी कविताबाई, व सात मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे, त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,