फोटोसावळी सदोबा : परिसरातील उमरी (कोपेश्वर) येथे एका शेतात हेडंबा यंत्राच्या साहाय्याने हरभरा काढणी सुरू होती. अचानक एक मजूर मशीनमध्ये आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
विष्णू भीमा धुर्वे (५०) रा. उमरी, असे मृत शेतमजुराचे नाव आहे. पारवा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या उमरी (कोपेश्वर) येथील शेतकरी राजू दादाराव काकडे यांच्या शेतात रविवारी हरभरा काढणी सुरू होती. शेतमजूर विष्णू धुर्वे अचानक हेडंबा मशीनमध्ये पडला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी परिसरातील लोकांची गर्दी झाली.
माहिती मिळताच पारवाचे ठाणेदार चव्हाण व पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी विष्णूला हेडंबा मशीनच्या बाहेर काढले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृताच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार आहे.
कुटुंबीयांचा हंबरडा
या घटनेची माहिती मिळताच विष्णू धुर्वे यांची पत्नी आणि मुलगी त्वरित घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तेथे पोहोचताच हंबरडा फोडला. तेथे उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना सावरले. विष्णू धुर्वे यांच्या एका मुलीचा विवाह झाला असून मुलगा पांढरकवडा येथे शिक्षण घेत आहे. घरात एक मुलगी विवाहयोग्य झाली आहे. विष्णू भूमिहीन असून मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने धुर्वे कुटुंबावर दु:खाचा डाेंगर कोसळला आहे.