लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: मारेगाव तालुक्यातील धामणी येथील अल्पभुधारक शेतकरी दिलीप गोविन्दा राजुरकर (वय ४८) वर्ष या शेतक-याने सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
चार वर्षांपूर्वी मुलीचे लग्न झाल्याने त्याच्यावर खाजगी व जिल्हा बँकेचे 35 हजारांच्या वर थकीत कर्ज होते. गेल्या चार वषार्पासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेने नापिकी होती. त्यामुळे तो परतफेड करु शकला नाही. यावर्षीच्या सोयाबीन, कापूस व तुर या पिकाने दगा दिल्याने तो हतबल झाला होता. अशातच खाजगी कर्जदाराकडून उसनवार घेतलेल्या पैशाचा सतत तगादा लावला जात असल्याने मागील एक महिन्यांपासून तो चिंताग्रस्त होता, अशी माहिती कुटूंबियांनी दिली. बुधवारी रात्री कुटुंबियांनी सोबत एकत्र जेवण केले. मुलगा बाहेर गेला आणि पत्नी आणि आई झोपायला गेली असताना घरातच रात्री 8:30 वाजताचे दरम्यान दिलीपने गळफास लावला.
कुटूंबियांच्या हा प्रकार लक्षात येताच तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एक वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला होता. त्याच्या मागे एक विवाहित मुलगी, एक अविवाहित मुलगा, पत्नी, आई असा परिवार आहे आहे.