संतोष कुंडकर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सरकारचे शेतीविषयक चुकीचे धोरण, शेतीचा वाढलेला खर्च, त्या तुलनेत उत्पादनाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. नैराश्यातून शेतकरी मृत्यूला जवळ करू लागले आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे, या हेतूने, 'बा शेतकऱ्या आत्महत्या करू नको... फिनिक्स हो..राखेतून भरारी घे', अशी साद घालत अॅफ्रो ही एनजीओ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे.
उपविभागातील वणी व मारेगाव या दोन तालुक्यांतील ४८ गावांमध्ये अॅफ्रो अर्थात अॅक्शन फॉर फूड प्रॉडक्शन ही एनजीओ शेतकऱ्यांसोबत काम करीत आहे. तब्बल चार हजार १२८ शेतकऱ्यांशी ही संस्था सातत्याने संवाद साधत आहे. आठवड्यातून तीन दिवस या संस्थेचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांना मार्गदर्शन करतात.
शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत झाला, तर त्याच्यावर आत्महत्येची पाळी येणार नाही. त्यासाठी शेतीवर होणारा खर्च कमी व्हावा, यासाठी ही एनजीओ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. उत्पादन वाढीसाठी गरज असेल तेथे सेंद्रिय किंवा रासायनिक खतांचा वापर किती व कसा करावा यासाठी ही संस्था शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे. मूळच्या अहमदनगर येथील या संस्थेकडून वणी-मारेगाव तालुक्यासाठी अतुल नत्थूजी पिदूरकर हे प्रोजेक्ट युनिट मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांच्या समवेत १२ कार्यकर्ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. या संस्थेच्या प्रयत्नांना यशही आले असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोलाम समाजात आत्महत्येचे प्रमाण कमी मारेगाव तालुक्यात कोलाम समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण या समाजात कमी आहे, असे या संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. हा समाज शेती व्यतिरिक्त रानात मिळणाऱ्या नैसर्गिक उत्पादनातून अर्थार्जन करतात. डिंक, तेंदूपत्ता, चार गोळा करून त्यातून पैसे मिळवितात.
तरुणाईची शेतीकडे पाठ गेल्या काही वर्षांत तरुणाईने शेतीकडे पाठ फिरविली आहे. घरात दोन मुले असतील, तर ती मुले शेती करण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे एकट्या वडिलांना मजुरांच्या भरवशावर शेती कसावी लागते. त्यामुळे शेतीचा खर्चही वाढतो. तरुणाई शेतीऐवजी नोकरीला प्राधान्य देत असल्याचे चित्र या परिसरात पाहायला मिळते.
"शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत व्हावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांविषयी असलेले आपले धोरण बदलावे. शेतकऱ्यांनी खचून न जाता शेती व्यवसाय करावा. शेतीसोबतच एखादा जोड व्यवसायही करावा. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल." - अतुल पिदूरकर, प्रोजेक्ट युनिट मॅनेजर, अॅफ्रो