विविध मागण्या : ओल्या दुष्काळावर मार्गदर्शनाची मागणी यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महागाव तालुक्यातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन शासनाला दिले. सोयाबीन पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत देण्याचे निश्चित झाले होते. परंतु यवतमाळ जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी मंडळनिहाय उंबरठा पद्धतीने निकष मदतीसाठी का लावण्यात आले, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. महगाव तालुक्यात सिजेंटा कंपनीचे बोगस बियाण्यांचे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यापूर्वीसुद्धा ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासनाने २०१६ मध्ये राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना सरसकट विमा मोबदला, आर्थिक जोखीम परतावा देण्यात यावा कारण सध्या सोयाबीन, मुंग, उडीद व इतर कडधान्यावर खोडकिडीने प्रादुर्भाव केला आहे. सततच्या पावसाने पिके नष्ट होत आहेत. कीडनाशकाबाबत उपाययोजनांसाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतीवर भेटी द्याव्या, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी प्रयोगशिल शेतकरी अमृतराव देशमुख, मनीष जाधव, गजानन तायडे, अशोक जाधव आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
महागावचे शेतकरी धडकले जिल्हा कचेरीवर
By admin | Published: August 05, 2016 2:38 AM