लोकमत न्यूज नेटवर्कनेर : परतीच्या पावसाने सडलेली बोंडं पाहून हतबल झालेल्या शेतकऱ्याने पाच एकर क्षेत्रात नांगर फिरवून पऱ्हाटी उद्ध्वस्त केली. हा प्रकार नेर येथील शेतकऱ्याने केला. हमीद खाँ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या चमूने या शेताची पाहणी केली. हमीद खाँ यांच्या शेतातील पऱ्हाटीला चांगली बोंडं आली होती. काही दिवसातच पांढरे सोने घरात येईल, अशी आस लावून हा शेतकरी बसला होता. दरम्यानच्या काळात झालेल्या परतीच्या पावसामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. जी काही बोंडं झाडाला लागून होती ती बोंडअळीने खाल्ली. या प्रकारात पऱ्हाटीच्या केवळ काड्या शेतात उभ्या राहणार होत्या. त्या पोसत बसण्यापेक्षा हमीद खाँ यांनी संपूर्ण शेतच नांगरून टाकण्याचा निर्णय घेतला. अश्रूभरल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालविला. नुकसान भरपाईची अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
अधिकारी पोहोचले शेतातहमीद खाँ यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालविल्याची माहिती मिळताच कृषी विभागाची चमू दाखल झाली. प्रशांत जोल्हे, जगदीश गावंडे यांनी शेताची पाहणी केली. पऱ्हाटीची बोंडं त्यांनी फोडून पाहिली ती किडलेली आढळली. या सर्व प्रकाराचा पंचनामा करण्यात आला.