वडकी (यवतमाळ) : नाल्यावरील पूल ठेंगणा असल्यामुळेच वृद्ध शेतकऱ्याचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी मंगळवारी वडकी येथे तब्बल दोन तास रास्ता रोको केला. पूल बांधण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे वडकी-यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
राळेगाव तालुक्यातील लाडकी येथील अण्णाजी बाळकृष्ण गुडदे (६०) हे सोमवारी वडकी येथून गावी लाडकी येथे निघाले होते. नाला पार करीत असताना ते वाहून गेले. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह दगडाला अडकून असलेला आढळला. मृतदेह बाहेर काढून नागरिक थेट वडकी-यवतमाळ मार्गावर पोहोचले. खडकी टोल नाक्याजवळ त्यांनी आंदोलन सुरू केले.
पूल बांधण्याचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अभियंता अनिल तोडे, किशोर नागरे, अली शेख हे आंदोलन स्थळी पोहोचले. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत पुलाचे बांधकाम केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी राळेगावचे तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, नायब तहसीलदार दिलीप बदकी, ठाणेदार संजय चोबे, ठाणेदार विनायक जाधव, मंडळ अधिकारी पोटे, महादेव सानप, तलाठी गिरीष खडसे आदी उपस्थित होते.
पाण्याचा अंदाज आला नाही
वडकी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना पूर गेले. लाडकी येथील नाल्यालाही पाणी चढले होते. याचा अंदाज न आल्याने अण्णाजी गुडदे यांनी वाट काढण्याचा प्रयत्न केला होता.